दोन हजारांची नोट सध्या चलनात फारशी दिसत नाही. तिची छपाई देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ही नोट घेण्यासाठी अनेकजण मागे पुढे पाहतात. नंदुरबारात असाच एक किस्सा घडला. बँक कॅशियरने विनवणी करूनही खातेदाराने ती नोट घेतलीच नाही. अखेर शंभर व पन्नास रुपयांच्या नोटा घेऊन खातेदाराने समाधान व्यक्त केले, पण दोन हजाराच्या नोटेला हात लावला नाही. त्याचे असे झाले, नंदुरबारातील बँकेत एक ग्रामीण भागातील खातेदार गेला. त्याने स्लीपमध्ये पाच हजार रुपये भरले. बँक कॅशियरने दोन हजारांच्या दोन नोटा व पाचशेच्या दोन नोटा दिल्या. दोन हजारांच्या नोटा पाहून खातेदार संतापला, बंद होणाऱ्या नोटा कशाला देता हो, मला नको त्या नोटा, पाचशेच्या नोटा किंवा सुट्टेही चालतील. त्यावर कॅशियरने त्याला समजावून सांगितले; परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मागे नोटाबंदीच्या वेळी आलेला अनुभव त्याने कथन केला व दोन हजाराची नोट घेण्यास नकार दिला. कॅशियरने अनेकदा समजावून सांगूनही उपयोग होत नसल्याचे दिसून आल्यावर अखेर शंभर व पन्नास रुपयांच्या नोटांचे बंडल देऊन त्या ग्राहकाचे समाधान केले. या प्रकारामुळे मात्र बँकेतील इतर ग्राहकांना ताटकळत राहावे लागले तर काही जणांचे मनोरंजनदेखील झाले.
-मनोज शेलार