हद्दपार युवकांचा नवापूरात वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:49 AM2019-03-18T11:49:29+5:302019-03-18T11:49:34+5:30
दोघांवर कारवाई : एक वर्षासाठी केले आहे हद्दपार
नवापूर : शहरातून हद्दपार केलेले दोन युवक शहरात आढळून आल्याने नवापूर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.
शहरात गेल्या दोन वर्षापासून मायाभाई नावाने गँग निर्माण करुन टोळीप्रमुख मयूर शैलेंद्र सावरे (२०), सनी शैलेंद्र सावरे (२३) व अजय राजेंद्र जाधव (२२) सर्व रा.शास्त्रीनगर, नवापूर यांचा नियमीत गुन्हे करण्यात सहभाग होता. नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी त्या प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करीत वर नमूद इसमांपैकी मयूर शैलेंद्र सावरे व सनी शैलेंद्र सावरे यांना नंदुरबार जिल्ह्यातून व अजय राजेंद्र जाधव यास नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका वगळून एक वषार्साठी हद्दपार करण्याचे आदेश दिल्याने त्यांना हद्दपार करण्यात आलेले होते.
त्यानंतर तीनही हद्दपार युवक हे नवापूर शहरात आल्याची गुप्त माहिती नवापूर पोलिसांना मिळाली. १६ मार्च रोजी रात्री सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक डी.डी. पाटील, डी.एस. शिंपी, पोलीस नाईक प्रविण मोरे, अनिल राठोड, पो.कॉ. योगेश्वर तनपुरे, महिला पोलीस नाईक सुरेखा वळवी यांनी ही कारवाई केली.