जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:04 PM2020-01-03T12:04:13+5:302020-01-03T12:04:19+5:30

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्याप्रमाणेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी या तिन्ही पक्षांची ...

Experiment leading to development in the district failed | जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसला

जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसला

Next

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्याप्रमाणेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा असली तरी नंदुरबार जिल्ह्यात मात्र हा प्रयोग पुरता फसला आहे. तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत असून अनेक गट आणि गणात याच पक्षांमध्ये प्रमुख लढत होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, तब्बल डझनभर नेत्यांचे वारसदार या निवडणुकीत भवितव्य अजमावीत असून त्यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेचे ५६ गट व जिल्ह्यातील सहा पंचायत समितींच्या ११२ गणांसाठी येत्या ७ जानेवारीला मतदान होणार आहे. माघारीनंतर सर्वच गट आणि गणातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी या निवडणुकीतही राज्याप्रमाणेच महाविकास आघाडी स्थापन करून काँग्रेस, शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढविण्याची चर्चा सुरू झाली होती. त्या संदर्भात या तिन्ही पक्षातील नेत्यांची मुंबईतही बैठक झाली होती. मात्र स्थानिक राजकारण आणि सर्वच पक्षातील इच्छूक उमेदवारांची मनधरणी करण्यात नेत्यांनाही अवघड झाल्याने महाविकास आघाडी न होता तिन्ही पक्षांतर्फे स्वतंत्र निवडणूक लढविण्यात येत आहे. जिल्ह्यातील राजकीय स्थिती पहाता या जिल्हा परिषदेत पूर्वी काँग्रेसची सत्ता होती. तर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्टÑवादी होती. शिवसेना आणि भाजपचे फारसे अस्तित्व नव्हते. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याने राजकीय समिकरण पुरते बदलले आहे. निवडणुकीत भाजपने सर्व ठिकाणी उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पाठोपाठ काँग्रेसनेही बहुतांश सर्वच ठिकाणी उमेदवार दिले आहेत. पण शिवसेना आणि राष्टÑवादीला मात्र सर्वच ठिकाणी उमेदवार देणे शक्य झालेले नाही. राष्टÑवादीने एकुण ५६ पैकी १४ गटात तर ११२ गणापैकी ११ गणात अधिकृत उमेदवार दिले आहेत. याशिवाय १४ अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केले आहे. शिवसेनेला देखील अनेक ठिकाणी उमेदवार देता आलेले नाही. अशा स्थितीत निवडणुकीत कुण्या एका पक्षाची सत्ता येईल अशी स्थिती आजतरी दिसून येत नाही.
या निवडणुकीचे वैशिष्टये म्हणजे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करणारे भाजपचे भरत गावीत व भाजपतीलच बंडखोर उमेदवार नागेश पाडवी हे दोन्ही भाजपतर्फे जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवित आहेत. बहुतांश नेत्यांचे वारसदार देखील आपले भाग्य अजमावीत आहेत. त्यात ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र अजीत नाईक व दीपक नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या पत्नी डॉ. कुमुदिनी गावीत, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पूत्र अ‍ॅड. राम रघुवंशी, माजी आमदार शरद गावीत यांच्या कन्या अर्चना व राजश्री गावीत, माजी आमदार अ‍ॅड.पद्माकर वळवी यांची कन्या अ‍ॅड.सिमा वळवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतिलाल पाटील यांचे पूत्र अभिजीत पाटील, माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी यांच्या पत्नी आशा पाडवी आदींचा समावेश आहे. नेत्यांच्या वारसदारांचे भवितव्य ठरविणारी असून निवडणुकीनंतर कुणाची पक्षाची युती होईल याची उत्सूकता आहे.

सर्वच पक्षातर्फे प्रचाराला जोर आला आहे. भाजपतर्फे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी प्रचारासाठी येत असून त्यांच्या धडगाव आणि बोरद येथे प्रचार सभा आहेत. तर काँग्रेसतर्फे मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांची शुक्रवारीच धडगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक आहे. इतरही नेत्यांच्या बैठक होत आहेत.

Web Title: Experiment leading to development in the district failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.