ऑनलाईन पीक नोंदणीमुळे शेतकरी हैराण;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:36 AM2021-09-14T04:36:07+5:302021-09-14T04:36:07+5:30
नंदुरबार : ई-पीक पाहणीचा शेतकऱ्यांमागील जाच संपता संपत नसल्याची स्थिती आहे. ई-पीकपेरा नोंदणी करण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी अंतिम मुदत ...
नंदुरबार : ई-पीक पाहणीचा शेतकऱ्यांमागील जाच संपता संपत नसल्याची स्थिती आहे. ई-पीकपेरा नोंदणी करण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी अंतिम मुदत आहे. परंतु त्या कालावधीत अनेक शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी होणार नसल्याची स्थिती आहे. अनेकांना ओटीपी लक्षात राहत नाही, काहींच्या शेतात इंटरनेटची रेंजच नाही, तर काहींना संबंधित ॲपच उमजत नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकरी वर्ग हैराण असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. महिनाभरापूर्वी कृषी विभागाने अध्यादेश काढून, यंदापासून शेतकऱ्यांनी स्वत:च पीक पेरा नोंदणी करण्याचे फर्मान काढले. त्यासाठी ऑनलाईन ॲपही विकसित करण्यात आले. एकाच वेळी पीक नोंदणी व त्यासाठीचे प्रशिक्षण अर्थात जनजागृती करण्यात आली. एकीकडे शेतकऱ्यांची खरीप हंगामातील शेतीकामांची लगबग, तर दुसरीकडे या ॲपची डोकेदुखी अशी स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांचा ई-पीकपेरा नोंद झालीच नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
काय आहेत अडचणी...
नंदुरबार जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती पाहिली, तर ४० टक्के भाग हा दऱ्याखोऱ्यांमधील शेतीचा आहे. अशा भागात अगदी अर्धा एकर ते दोन एकर शेती नावावर असलेेले शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल असेलच असे नाही. शासनाच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडील स्मार्ट मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे ही पीक नोंदणी करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही, त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
इंटरनेट रेंजची अडचण
जिल्ह्यातील अनेक भागात इंटरनेट रेंजची अडचण आहे. त्यामुळे ओटीपी येणे, इतर सर्व माहिती भरणे ही प्रक्रिया करण्यासाठी अनेक ठिकाणी किमान दोन तास, तर जास्तीत जास्त आठ तासांचा कालावधी लागतो आहे. काही ठिकाणी शेतकरी कंटाळून अर्ध्यातूनच ते सोडून देत आहेत. पिकासोबतचा शेतकऱ्याचा फोटो देखील त्यात आवश्यक असल्याने फोटो इमेज रिझोलेशन जास्त असल्यास तो डाऊनलोड होण्यास अडथळे येत आहेत. अनेक शेतकऱ्यांना तर आलेला ओटीपीच लक्षात राहिला नसल्याची स्थिती आहे. काही शेतकऱ्यांच्या नावावर नोंद असलेली जमीन व प्रत्यक्षातील जमीन यात काही गुंठ्याचा फरक असल्याने ती तांत्रिक अडचण दर्शवून ॲप ते देखील स्वीकारत नसल्याचे सांगण्यात आले. दिलेला हेल्पलाईन नंबर देखील वेळेवर लागेलच व तिकडून सांगितलेल्या सूचना समजतीलच असे नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.