सण आला दारी, वीज नाही घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:35 AM2021-09-14T04:35:56+5:302021-09-14T04:35:56+5:30
किमान सणासुदीत तरी नागरिकांना अखंडित वीज मिळणे अपेक्षित आहे. मात्र सुलतानपूर वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या ब्राम्हणपुरी, सुलवाडे, सुलतानपूर, रायखेड, खेडदिगर, ...
किमान सणासुदीत तरी नागरिकांना अखंडित वीज मिळणे अपेक्षित आहे. मात्र सुलतानपूर वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या ब्राम्हणपुरी, सुलवाडे, सुलतानपूर, रायखेड, खेडदिगर, मुबारकपूर, आडगाव, बहिरपूर आदी गावांमध्ये अचानक वीजपुरवठा खंडित होणे हे नित्याचेच बनले आहे. कधी दुरुस्तीच्या नावाखाली, कधी बिघाडामुळे, तर कधी देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली वीज गुल होत आहे. सुलतानपूर वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या भागातील वीजपुरवठा गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे मंगळवारी मध्यरात्री शहादाहून येणाऱ्या ३३ के.व्ही. या वाहिनीत बिघाड झाल्याने खंडित झाला होता. बुधवारी देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे ३२ तास वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. ग्रामीण भागात शुक्रवारी मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. यापुढे नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी असे सणांचे दिवस आहेत. पावसाळ्यात गवत वाढले असून सर्प, विंचू व कीटकांच्या भीतीने अंधारात घराबाहेर पडणे धोक्याचे बनले आहे. डासांच्या उपद्रवाने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच व्यावसायिकांचेही आर्थिक नुकसान होत आहे. वीज वितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांनी येथील वीज समस्या कायमस्वरूपी संपविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्यावा, अशी माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
वसुली जोरात, मग खबरदारीही घ्या...
थकीत वीज बिल वसुलीची मोहीम सध्या जोरात सुरू आहे. पण वसुलीबरोबरच अखंडित वीज पुरवठ्यासाठीही महावितरणने खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
वीजपुरवठ्याची यंत्रणा जुनाट
पावसाळ्यात कुठे तारा तुटणे, झाडांच्या फांद्या वीजवाहिनीवर पडणे अशा अनेक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होतो. हा प्रकार घडू नये म्हणून महावितरण प्रशासनातर्फे मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. पण थोडा जरी पाऊस पडला तरी, वीज गेलीच समजा, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वीज पुरवठ्याची यंत्रणा जुनाट झाली आहे.
परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुख्यालयी कोणी वायरमन राहत नसल्याने रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित झाल्यास सकाळी वीज पुरवठा सुरळीत केला जातो. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वीज कधी येईल याची विचारणा केली, तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. जर तक्रार केली, तर त्याच्या घरी छापा टाकून कारवाई केली जाते.
- अनिल सुभाष पाटील, ग्राहक, सुलवाडे, ता. शहादा
संबंधित अभियंत्याला सूचना देतो
वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या माहितीसाठी संबंधित उपकार्यकारी अभियंता वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित सहायक अभियंता यांना वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना देतो.