पद्मावत चित्रपटासाठी दाऊदकडून अर्थपुरवठा : नंदुरबार येथे आमदार राजासिंह ठाकूर यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:46 PM2018-01-23T12:46:19+5:302018-01-23T12:46:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पद्मावती चित्रपटामधून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. यामध्ये पद्मावती राणीला नाचताना दाखवण्यात आले. यामध्ये केवळ संजय लिला भन्साळी यांचा हात नाही तर पद्मावती चित्रपटाला दाऊदसारख्या आतंकवाद्यांकडून अर्थपुरवठा झाला आहे, असा गंभीर आरोप प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष आमदार राजासिंह ठाकूर यांनी येथे केला.
येथील जुन्या पोलीस मैदानावर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या हिंदू धर्मजागृती सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना आमदार ठाकूर यांनी आरोप केला. शंखनादाने सभेला प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण केला. त्यानंतर वेदमूर्ती योगेश गव्हाले, भूषण जोशी यांनी वेदमंत्र पठण केले. या सभेला सनातनच्या संत पूज्य केवळबाई पाटील यांच्यासह आमदार डॉ.विजयकुमार गावीत, भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, नंदुरबारचे नगरसेवक आनंदा माळी, तळोद्याचे नगरसेवक रवी महाजन, मोठा मारुती मंदिराचे अध्यक्ष अशोक चौधरी, गोरक्षक केतन रघुवंशी, नगरसेवक चारूदत्त कळवणकर, गौरव चौधरी, पवन अग्रवाल, कमल ठाकूर उपस्थित होते. या सभेला सहा हजारांहून अधिक हिंदू उपस्थित होते. यामध्ये युवकांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात होता.
या वेळी आमदार राजासिंह ठाकूर म्हणाले, यापूर्वी संजय भन्साळी यांनी काढलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात बाजीरावाला रंगेल दाखवण्याचा प्रय} केला. अशाप्रकारे चित्रपट काढून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा संजय भन्साळी यांचा प्रय} आहे. पद्मावती केवळ राजपूतांची राणी नाही तर समस्त हिंदू समाजाची राणी आहे. ‘द विंची कोड’ या चित्रपटात ‘जीझस नाही’ असे दाखवण्यात आले होते. हा चित्रपट संपूर्ण जगात प्रदर्शित झाला. भारतात मात्र या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. ‘विश्वरुपम’ या चित्रपटावर तामिळनाडूमध्ये बंदी घालण्यात आली होती. ‘इंदू सरकार’ चित्रपटाच्या विरोधात काँग्रेसवाल्यांनी देशभर आंदोलने केली. हे सर्व चालते. मात्र हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान होतो त्याची दखल कुणी घेत नाही. केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळावरही (सेन्सॉर बोर्ड) त्यांनी आरोप केले. राज्यात गोहत्या बंदी कायदा असूनही गोमातेच्या हत्या होत आहेत. याकडे सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालावे, असे मत आमदार राजासिंह ठाकूर यांनी व्यक्त केले.
नंदुरबार नव्हे, नंदनगरी
यापुढे जिल्ह्याला नंदुरबार नव्हे, तर नंदनगरी या नावाने ओळखले जावे. सर्वानी आजपासूनच या जिल्ह्याला नंदनगरी असे म्हणावे, असे आवाहनही आमदार राजासिंह यांनी केले.
स्वसंरक्षण प्रशिक्षण
रणरागिणी शाखेच्या क्षिप्रा जुवेकर म्हणाल्या, की दुष्टांचा संहार करणारी दुर्गा, चंडी, काली या हिंदू धर्मातील देवींचा आदर्श आपल्यासमोर असताना तरूणींनी अबला नव्हे; तर सबला बनून सामना करून आपले शौर्य गाजवले पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पाच हजारांहून अधिक मुली यावर्षी बेपत्ता झाल्याची माहिती उघड केली आहे. या मुली नेमक्या गेल्या कुठे? स्वत:चा आत्मसन्मान जपण्यासाठी स्वसंरक्षण वर्गात प्रशिक्षण घ्यावे.
रागेश्री देशपांडे म्हणाल्या की, विदेशातून चर्चला कोटय़ावधी रूपये पाठविले जातात. त्यातूनच नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात धर्मातर केले जात आहे. धर्मातर रोखण्यासाठी संपूर्ण देशात धर्मातर बंदी कायदा लागू करायला हवा. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंची धर्माविषयीची जागरूकता अल्प पडते आहे. अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्यास त्यांच्या भावनांचा विचार होतो. मात्र, हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या अवमानाच्या वेळी व्यक्ती स्वातंत्र्य म्हटले जाते. लोकशाहीत शिक्षण, आरोग्य, न्यायालय कोणतेच क्षेत्र भ्रष्टाचारापासून सुटलेले नाही. सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.
या वेळी सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनीही मार्गदर्शन केले. हिंदू जनजागृती समितीच्या उल्लेखनिय कार्याचा आढावा डॉ.नरेंद्र पाटील यांनी मांडला. सूत्रसंचालन प्रशांत जुवेकर यांनी केले.