चौरंगी लढतीत दिग्गजांची प्रतिष्ठा लागली पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:06 PM2019-10-15T13:06:24+5:302019-10-15T13:06:30+5:30
सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा- तळोदा विधानसभा मतदारसंघातून दोघा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने चार उमेदवार ...
सुनील सोमवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा- तळोदा विधानसभा मतदारसंघातून दोघा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यावेळी मतदारसंघात चौरंगी लढत आहे. सध्या प्रचारात रंगत आली असून रणधुमाळी शिगेला पोहचली आहे.
या विधानसभा मतदारसंघात तीन अपक्ष उमेदवारांसह एकूण सहा उमेदवार छाननीअंती निवडणुकीच्या रिंगणात होते. माघारीच्या अंतिम दिवशी मोहन शेवाळे व सचिन कोळी या दोघा अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात काँग्रेसचे पद्माकर वळवी, भाजपचे राजेश पाडवी, माकपाचे जयसिंग माळी व अपक्ष उमेदवार जेलसिंग पावरा यांचा समावेश आहे. शहादा- तळोदा हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण या किल्ल्याला गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार उदेसिंग पाडवी यांनी भगदाड पाडून विजय मिळवला होता. अर्थात त्यावेळी युती व आघाडी झाली नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या चारही प्रमुख पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिले होते. परंतु तरीही माजी मंत्री असलेल्या पद्माकर वळवी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी पद्माकर वळवी यांची लढत उदेसिंग पाडवी यांचे पुत्र राजेश पाडवीशी आहे. मागे तीनवेळा विजयी झालेले पद्माकर वळवी तसेच पोलीस सेवेतील अनुभव आणि स्थानिक स्तरावर सामाजिक काम असलेले राजेश पाडवी अशी ही लढत रंगणार आहे. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडून कमळाची साथ घेतल्याने तालुक्यातील काँग्रेसची मोठी शक्ती जी गेल्यावेळी पद्माकर वळवी यांच्या पाठीशी होती ती शक्ती यावेळी राजेश पाडवींच्या पाठीशी राहणार आहे. परिणामी वळवी यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरल्याने राजेश पाडवींना बळ मिळाले आहे. तालुक्यात आणि मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. अपक्ष उमेदवार जेलसिंग पावरा हे देखील मोठय़ा प्रमाणावर मते घेतील असे दिसते. माकपाचे जयसिंग माळी यांचीही उमेदवारी दखल घेण्यासारखी आहे.
लढतीतील चार उमेदवार व त्यांचे पक्ष
पद्माकर वळवी (काँग्रेस), राजेश पाडवी (भाजप), जयसिंग माळी (माकप), जेलसिंग पावरा ( अपक्ष)
सत्ताधारी भाजपचे प्रचाराचे मुद्दे
तापी नदीवरील 22 उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर व कामाला सुरुवात.
शहादा शहर विकास योजनेसाठी भरपूर निधीची उपलब्धता करून देत विकासाला चालना दिल्याचा दावा.
शहरातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी मंजुरी मिळवली.
शेतक:यांसाठी शेतकरी सन्मान योजना सुरू करून तालुक्यात जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रय}.
नर्मदा आणि तापी नदीचे जवळपास 15 टीएमसी पाणी मतदारसंघात आणणार.
विरोधी काँग्रेसचे प्रचाराचे मुद्दे
कर्जमाफी योजनेपासून शहादा परिसरातील आणि तळोदा तालुक्यातील अनेक शेतकरी अजूनही वंचित.
शहादा एमआयडीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित, त्यामुळे औद्योगिकरण थांबले.
उपसा सिंचन योजना दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबित, निधी मिळूनही कामांना गती नसल्याचा आरोप.
मतदारसंघातील अनेक सिंचन प्रकल्प अपूण रहिले आहे. सत्ताधा:यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
रस्त्यांचे प्रश्न निकाली निघत नसल्याचा आरोप.
लाभार्थीना योजनांचा लाभ मिळण्याचा अभाव.