नंदुरबार : जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०१३पासून सरळसेवा भरतीनुसार १० टक्के आरक्षण देण्याची मागणी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने केली आहे. या आरक्षणांतर्गत पदावर नियुक्ती न झाल्याने कर्मचारी बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना दिलेल्या निवेदनानुसार, राज्य शासनाने २००५मध्ये अधिसूचना काढून जिल्हा परिषदेच्या सरळसेवा भरतीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १० टक्के आरक्षण देण्याचे निश्चित केले होते. या भरतीमध्ये एकूण पदांच्या १० टक्के जागा ह्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव असूनही त्यांना त्या पदांवर नियुक्ती मात्र देण्यात आलेली नाही. आरोग्यसेवक पद भरण्यासाठी सूचित करण्यात येऊनही त्यांच्याकडून कारवाई करण्यात आलेली नाही. यासाठी वारंवार पाठपुरावा करुनही टाळटाळ होत असल्याने कर्मचाऱ्यांवर होणारा हा अन्याय थांबविण्यात यावा, एक महिन्याच्या आत याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर ग्रामपंचायत कर्मचारी बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष वसंतराव दाैलत वाघ, विरेंद्र वेस्ता वसावे, राकेश धर्मा वसावे, राजाराम गोमा पवार, सिंगा पोहल्या पावरा, रवींद्र हिरामण कोळी यांच्या सह्या आहेत.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सरळसेवेत १० टक्के आरक्षण द्या अन्यथा उपाेषण - ग्रामपंचायत कर्मचारी संघटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:36 AM