अश्वत्थामा यात्रेकरुंची भव्य मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:23 PM2019-10-29T12:23:12+5:302019-10-29T12:23:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गेल्या तीन दिवसापासून सातपुडय़ाच्या तिस:या रांगेत भरलेल्या अश्वत्थामा यात्रेचा सामारोप रविवारी शहरातील हनुमान मंदिराच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : गेल्या तीन दिवसापासून सातपुडय़ाच्या तिस:या रांगेत भरलेल्या अश्वत्थामा यात्रेचा सामारोप रविवारी शहरातील हनुमान मंदिराच्या दर्शनानंतर करण्यात आला. या वेळी हजारो यात्रेकरू यात्रेत सहभागी झाले होते. यात्रेकरूंनी डफ-ताशांच्या गजरात वाजत-गाजत व नाचत मिरवणुकीने यात्रोत्सवाची सांगता केली. ऐन पावसाळ्यात यात्रेकरू मोठय़ा श्रद्धेने बेधुंद होऊन ठेका घेत होते. डफ-ताशांच्या गजरात आणि ‘सिग्गरवाले बाबां’च्या जयघोषाने तळोदानगरी दुमदुमली होती. दरम्यान, यात्रकरूंबरोबरच भाविकांच्या गर्दीने बाजारपेठही गजबजली होती.
समुद्र सपाटीपासून साधारण चार हजार फुट उंचीवर असलेल्या सातपुडय़ातील तिस:या रांगेतील अस्तंबा ऋषींच्या यात्रोत्सवास धनत्रयोदशीपासून सुरूवात झाली होती. यात्रेचा प्रारंभ व समारोप मुख्यता तळोदा शहरातूनच केला जात असल्याने यंदाही रविवारी यात्रेकरूंनी शहरातील हनुमान मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर सांगता केली. तत्पूर्वी नेहमी प्रमाणे यात्रेच्या समारोपाच्या आदल्या दिवशी यात्रेकरूंनी शहरातील आणि बाजूच्या शेत मळ्यात मुक्काम केला होता. त्यानंतर रविवारी सकाळी कॉलेज रस्त्यावरील चौफुलीपासून मिरवणुकांना सुरूवात करण्यात आली. या वेळी एका मागून एक डफ-ताशांनी वाजत-गाजत मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. या वेळी यात्रेकरूंनी राम-लक्ष्मण-सीतासह विविध प्राण्यांची सोंगे घेऊन वाद्याच्या तालावर ठेका धरून भर पावसात बेधूंद नाचत होते.
तब्बल दीड किलोमीटर पावेतो मिरवणुकीच्या रांगा लागल्या होत्या. ताशांचा गजर आणि सिग्गर वाले बाबाच्या जयघोषाने तळोदा नगरी डुमडुमली होती. सलग आठ नऊ तास मिरवणुका चालल्या होत्या. यात्रे करूंच्या मिरवणुका पाहण्यासाठी तालुक्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली हेाती. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते गर्दीचे तोबा फुलले होते. शहराची बाजारपेठदेखील गजबजली होती. मिरवणुकांमुळे पोलिसांनी मेनरोड, बाजारपेठकडील वाहतूक बंद केली होती. मात्र किरकोळ व्यावसायिक लॉरीधारकांनी मनमानीपणे रस्त्याच्या मधोमध लॉ:या उभ्या केल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पोलिसांच्या अनियंत्रणाबाबत यात्रेकरूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यंदा प्रथमच यात्रेच्या समारोपावेळी यात्रेकरूंनी सजवलेला अश्व आणला होता. या अश्वानेही ताल धरल्याने भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. समारोपाची शोभायात्रा पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ व महिला मोठय़ा संख्येने तळोदा शहरात आल्याने शहराला यात्रेचे स्वरुप आले होत़े
स्वयंसेवी संस्थांकडून भोजन प्रसादी
यंदाही काही स्वयंसेवी सनस्थांनी यात्रोत्सवातील यात्रेकरू व भाविकांसाठी भोजनप्रसादाचे नियोजन केले होते. प्रसादासाठी स्टॉलवर मोठी झुंबड उडाली होती. याशिवाय ठिक-ठिकाणी व्यावसायिकांनी पाण्याचे ड्रमदेखील ठेवले होते. शहरवासियांच्या मदतीचा हात पाहून यात्रेकरूही भारावले होते. दरम्यान, निवडून आलेले शहादा-तळोदा मतदार संघातील आमदार राजेश पाडवी यांनी यात्रेकरूंच्या प्रत्येक विजर्सन मिरवणुकीस भेट देऊन यात्रेकरूंचा उत्साह वाढविला होता. या वेळीही त्यांचे कार्यकर्ते सोबत होते.