किशोर मराठे, लोकमत न्यूज नेटवर्क, वाण्याविहीर (जि. नंदुरबार): सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात अद्यापही धड रस्ते नसल्याने एका नवरदेवाला सुमारे २० किलोमीटर वऱ्हाडी मंडळींच्या खांद्यावर बसून नवरीचे आंबापाडा हे गाव गाठावे लागले. अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम केवडी ते जांगठी या पायवाटेने पूर्ण वऱ्हाडी मंडळींनीही पायपीट करीत लग्नमंडप गाठला. दरवर्षी कोट्यवधींचा मिळणारा निधी कागदावर खर्च होतो परंतु रस्त्यांची लागलेली वाट तशीच राहते.
सकाळी निघालेले वऱ्हाड दुपारी पोहोचले
नवरदेवाला नेण्याची जबाबदारी दऱ्याखोऱ्यातील अवघड पायवाटांवर चालण्यात तरबेज असलेल्या युवकांवर सोपविली होती. तरीही सकाळी निघालेले वऱ्हाड दुपारपर्यंत मंडपात पोहोचले.
परतीचा प्रवासही तसाच
- केवडी येथील नवरदेवाने नवरीचे गाव गाठण्यासाठी वऱ्हाडीच्या खांद्यावर सुमारे २० किलोमीटर अंतर कापले. लग्न लावून पुन्हा नवरीला सोबत घेत पायवाटेनेच आपल्या गावी परतले.
- केवडीच्या कोतवालपाडा येथील मिथुन खिमजी वसावे या नवरदेवाचा २० किमी अंतरावरील आंबापाडा येथील युवतीशी १२ जूनला विवाह होता. एरवी ‘दुल्हेराजा’ आणि वऱ्हाडी मंडळींची आलिशान वाहनांमधून ‘एंट्री’ होते. मात्र, वाहन तर सोडा साधे पायी चालणेही कठीण असल्याने नवरदेवाला खांद्यावरून नवरीचे गाव गाठावे लागले.