‘आरोग्यमयी’ गोळ्यांनी दूर होणार जिल्ह्यातील लहान बालकांचा ‘जंतदोष’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:29 AM2021-09-13T04:29:00+5:302021-09-13T04:29:00+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्याने आरोग्य विभागाने विविध लसीकरण व मोहिमांना प्रारंभ केला आहे. यातून येत्या २१ सप्टेंबर ...
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्याने आरोग्य विभागाने विविध लसीकरण व मोहिमांना प्रारंभ केला आहे. यातून येत्या २१ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी १ ते १९ वर्षांपर्यंतच्या पाच लाख मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जाणार आहेत. आरोग्य विभागाकडून यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण येत्या काळात होणार आहे.
२१ सप्टेंबर जिल्ह्यात ज्या शाळा सुरू आहेत त्या शाळास्तरांवर, घरोघरी आशा व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आशांची पथके निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. २१ रोजी ज्या बालकांचे लसीकरण होणार नाही त्यांचे लसीकरण येत्या २८ सप्टेंबर रोजी करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती दिली गेली आहे. त्यानुसार तयारी सुरु झाली आहे.
काय आहे जंतदोष?
कृमी या जंतदोषामुळे अनेकांच्या चेहऱ्यांवर पांढरे चट्टे येतात. यातून ॲनेमियाचे प्रमाण वाढते. मुलांची भूक मंदावते याचाच परिणाम त्याच्या शारीरिक व मानसिक वाढीवर होत असतो. त्यातून त्याला विविध आजार उद्भवू शकतात. अशावेळी या गोळ्या दिल्यानंतर जंतदोष होत नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
वयाच्या १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या
१ ते १९ वर्षांपर्यंतच्या मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या जातात. यात १ ते ३ वर्षांपर्यंतच्या मुलांना गोळीची पावडर करून तिचे पाणी दिले जाते. तर ३ वर्षांपुढील मुलांना एक गोळी त्यांना चावून खायला सांगितली जाते. ही गोळी गोड असल्याने लहान मुलांना सहज खाता येते. दर सहा महिन्यात गोळ्या वाटपाचा कार्यक्रम आरोग्य विभागाकडून राबवला जाताे.
गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?
जंतदोषापासून बालकांना दूर ठेवण्यासाठी पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाकडून २१ सप्टेंबर रोजी मोहिमेंतर्गत गोळ्यांचे वाटप होणार आहे. प्राथमिक आराेग्य केंद्र, उपकेंद्र, आशा व अंगणवाडी सेविका यांच्याकडून या गोळ्या उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोविडमुळे शाळा व अंगणवाडी बंद असल्याने मोहिमेवर थोडा परिणाम झाला होता; मात्र घरोघरी जाऊन या गोळ्या वाटप करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. २१ व २८ रोजी या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
- डॉ. महेंद्र चव्हाण,
जिल्हा आरोग्य अधिकारी.
या गोळ्यांच्या घरोघरी वाटपाची मोहीम ही दरवर्षी जिल्हा आरोग्य विभागाकडून राबविली जात असते. त्या पार्श्वभूमीवर याबाबत जनजागृतीही केली जाते. पूर्वी शाळांमध्ये सप्टेंबर महिन्यात मोहिमा आखून कामकाज होत होते, परंतु कोरोनामुळे सर्वकाही ठप्प होते. शाळा अद्यापही पूर्णपणे सुरु झाल्या नसल्याने घरोघरी गोळ्या वाटप होतील.