नंदुरबार : शहादा तालुक्यातील कलमाडी तर्फे हवेली येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराला लागलेल्या आगीत संसार उपयोगी वस्तू व बचत केलेली रोख रक्कम जळून खाक झाली. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
कलमाडी तर्फे हवेली येथील परशुराम ठाकरे हे आपल्या कुटुंबासह शेती काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी छाया परशुराम ठाकरे या आशा वर्कर असून त्या दुपारी आपले काम करून घरी आल्या. त्यावेळी त्या किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी गेल्या असता त्यांना गॅस सिलिंडर लीक झाल्याचा अंदाज आल्याने त्यांनी आपल्या दोन मुलींसह घरातून तत्काळ बाहेर धाव घेतली. त्याचवेळी अचानक गॅस सिलिंडरच्या स्फोट झाला.
हा स्फोट इतका भयंकर होता की घरातील छत व भिंतीही कोसळल्या असून आगीच्या ज्वाळा बाजूच्या परिसरापर्यंत पोहोचल्या. अचानक झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून परिसरातील नागरिकांनी व गावातील सरपंच यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घरातील संपूर्ण संसार उपयोगी वस्तू तसेच रोख रक्कम जळून खाक झाल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. तरी शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांनी काढली रात्र जागून
अचानक झालेला गॅस सिलिंडरचा स्फोट इतका भयानक होता की ग्रामस्थ संपूर्ण भयभीत होऊन रात्र जागून काढल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. तलाठ्यांनी पंचनामा केला असला तरी जबाबदार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देणे अपेक्षित होते असे ग्रामस्थांनी सांगितले.