विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:35 AM2021-07-14T04:35:52+5:302021-07-14T04:35:52+5:30

नंदुरबार : पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव रेल्वे मार्गावरील प्रवासी गाड्या गेल्या दीड वर्षात वेळाेवेळी बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. केवळ ...

How many more days will the robbery of passengers under the name of special train continue? | विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार ?

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार ?

Next

नंदुरबार : पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव रेल्वे मार्गावरील प्रवासी गाड्या गेल्या दीड वर्षात वेळाेवेळी बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. केवळ गरजेच्या गाड्या वगळता लांब पल्ल्याच्या काही विशेष प्रवासी रेल्वे गाड्या मार्गावर सध्या सुरू आहेत; परंतु या विशेष गाड्या प्रवाशांची लूट करणाऱ्या ठरत असून प्रवाशांना जवळच्या शहरांसाठी आरक्षण करून जादा भाडे द्यावे लागत आहे.

एप्रिल २०२० मध्ये शिरकाव करणाऱ्या कोरोनामुळे प्रथमच देशाची जीवनवाहिनी असलेली रेल्वे बंद पडली होती. उधना ते जळगाव मार्गावर नंदुरबार रेल्वेस्थानकातून दरदिवशी साधारण ५२ प्रवासी गाड्या धावत होत्या. या गाड्या कोरोनामुळे पूर्णपणे थांबवून कोविड विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या. गुजरात, उत्तर भारत, पूर्वोत्तर राज्य आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या या गाड्यांमधून जळगाव, भुसावळ, सुरत, बारडोली आदी शहरात जाण्यासाठी रिझर्व्हेशन करावे लागत असल्याने प्रवासीही हैराण झाले आहेत. आरक्षणानंतरही जागा मिळण्याबाबत अडचणी असल्याने या गाड्यांपेक्षा प्रवासी खाजगी वाहने किंवा एसटीने प्रवास करतात.

विशेष प्रवासी रेल्वे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पहाटेच्या पॅसेंजर गाड्या बंद केल्या आहेत. मात्र पुरी-अजमेर, हिसार-सिकंदराबाद यासह आणखी दोन विशेष गाड्या सुरू ठेवल्या आहेत. या गाड्यांना अन्य एक्स्प्रेसपेक्षा भाडे जास्त आकारले जात आहे. अहमदाबाद-बरोनी या विशेष रेल्वे गाडीला नंदुरबार स्थानकात थांबा आहे; परंतु तिचे तिकीट दर महाग असल्याने प्रवाशांना अडचणी येतात. नंदुरबार येथून आरक्षण होत नाही.

तिकिटात फरक किती?

पॅसेंजरने नंदुरबार ते जळगाव भाडे ३७ रु., तर नवजीवन व हावडा या गाड्यांचे तिकीट हे ७८ रुपये आहे. या विशेष गाड्यांना ७५ ते ८० रुपये जादा लागत आहेत. हे वाढीव दर कमी करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी

सद्य:स्थितीत पॅसेंजर व मेमो गाड्यांना आरक्षणाची गरज नाही; परंतु नवजीवन एक्स्प्रेस, अहमदाबाद हावडा, अजमेरपुरी, ताप्ती-गंगा, खान्देश, बरोनी एक्स्प्रेस आदी गाड्यांना आरक्षण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. जनरल डबा नसल्याने सर्वसामान्य प्रवाशाला जादा पैसे द्यावे लागतात. सुरत शहराकडे जातानाही आरक्षण करण्याची सक्ती केली जात आहे. आरक्षणानंतरही जागा मिळत नसल्याचे प्रवासी सांगत आहेत.

कोरोनात गर्दी आटोक्यात येण्यासाठी आरक्षण महत्त्वाचे होते; पण कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने आरक्षण अट रद्द करणे आवश्यक ठरत आहे.

लांब पल्ल्याच्या सर्वच प्रवासी गाड्यांना आरक्षण अत्यावश्यक आहे. त्याशिवाय गाडीत प्रवेश मिळत नाही. भुसावळ-सुरत-भुसावळ रेल्वेलाइनवरील नंदुरबार रेल्वेस्थानकावर आजघडीस लांब पल्ल्याच्या ४२ गाड्या आठवडाभरातून चालत आहेत. यातील चार गाड्या ह्या दैनंदिन तर उर्वरित गाड्या ह्या साप्ताहिक आहेत. सर्वच गाड्यांना नंदुरबार येथे थांबा आहे; परंतु काही गाड्यांचे आरक्षण मात्र सुरत किंवा बडोदा या स्थानकांचे अंतर दर्शवून काढावे लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. यातून २०० ते २५० रुपयांचा जादा खर्च करावा लागत असल्याची माहिती आहे. दरम्यान, आरक्षणही मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.

सुरत-अमरावती पॅसेंजर गाडी सुरू करण्यासह नियमित पॅसेंजर गाड्या सुरू केल्या पाहिजेत. रात्री व पहाटेची पॅसेंजर गाड्यांची एक फेरी वाढवली पाहिजे. नवजीवन व हावडा यासारख्या गाड्यांचे आरक्षण रद्द करून जनरल बोगी लावून प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी संधी देणे गरजेचे आहे. गुजरातमध्ये प्रवास होत असल्याने तिकिटासाठी धावपळ होते.

-संदेश पाटील, प्रवासी

नंदुरबार हे मोठे स्थानक आहे. सुविधा निर्माण झाल्या आहेत. कोरोनामुळे रेल्वे प्रवास करण्यासाठी अनेक अटी लागू करण्यात आल्या आहेत. या अटी शिथिल कराव्यात, विशेष रेल्वे गाड्यांचे दर कमी करावेत, अकोल्यापर्यंतचे रिझर्व्हेशन करण्यासाठी अडचणी येतात. जळगावसाठी रिझर्व्हेशन सक्ती केली जाते. हे थांबवण्याची आवश्यकता आहे. याकडे लक्ष दिले पाहिजे.

-योगेश चाैधरी, प्रवासी

Web Title: How many more days will the robbery of passengers under the name of special train continue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.