नंदुरबार : जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी डी. एड. काॅलेजचे अक्षरश: पीक आले होते. तब्बल ३२ काॅलेज सुरू झाली होती. आजच्या स्थितीत १९ काॅलेज बंद पडून केवळ १३ सुरू आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत दरवर्षी निम्मे विद्यार्थीही प्रवेश घेत नसल्यामुळे अनेक ठिकाणी शुकशुकाट आहे. त्याला विविध कारणे असली तरी सध्याच्या परिस्थितीत डी.एड.कडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. एकूण जागांच्या तुलनेत अवघे ३० टक्के प्रवेश अर्ज आले आहेत.
काही वर्षांपूर्वी डीएड प्रवेशासाठी अर्ज करूनही यादीत नाव येते की नाही, याची प्रतीक्षा करावी लागायची. मात्र, शिक्षक घडविणाऱ्या महाविद्यालयांच्या वाट्याला आता वनवास आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १३ कॉलेजमध्ये ८५० जागांसाठी केवळ २०१ अर्ज आले आहेत. त्यामुळे डीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी शिक्षक बनतात. मात्र, नंतर नोकरी मिळविण्यासाठी पुन्हा टीईटी देणे अनिवार्य असते. दरम्यान, टीईटी देऊनही नोकरीसाठी वेटिंगच करावी लागत असल्याने डीएडला प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास पसंती देत आहेत.
परिणामी, विद्यार्थ्यांचे प्रवेशच होत नसल्याने काही डीएड कॉलेज बंद करण्याची वेळ संस्थाचालकांवर आली असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.
सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
आणखी किमान १०० प्रवेशअर्ज गृहीत धरले तरी एकूण जागांच्या निम्म्या जागाही होणार असल्याचे चित्र आहे.
नोकरीची हमी नाही
डीएड केल्यानंतर नोकरीसाठी पैशांची मागणी होते. अनेकांची परिस्थिती नाजूक असल्याने नोकरीसाठी प्रतीक्षा करावी लागते.
भरती बंद असल्याने अनेक जणांना शाळेवर कंत्राटी तत्त्वावर काम करावे लागते. अल्प मानधन मिळते.
सद्यस्थितीत भरती नाही, नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरविली आहे.
शासन निर्णयानुसार लवकरच शिक्षकांच्या जवळपास ४० हजार जागा भरल्या जाणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने युवक नोकरीला लागले तर आपोआप डी.एड.ला पुन्हा पूर्वीची मागणी होणार आहे. डी.एड.नंतर टीईटी द्यावीच लागते. त्यामुळे देखील काही विद्यार्थ्यांचा कल आता कमी झाला असल्याचे डी.एड.महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी बोलतांना सांगितले.
प्राथमिक शिक्षकांची पदे गेल्या काही वर्षांत भरली गेली नाहीत. त्यातच डी.एड.करून अनेक युवक बेरोजगार आहेत. त्यातच सीईटी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण देखील कमी आहे. परिणामी डी.एड.करून नोकरीची हमी नाही. त्यामुळे आपण अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.
-गबा खैरनार, विद्यार्थी.
इतर अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास किमान रोजगाराची संधी असते. डी.एड.झाल्यानंतरही नोकरी मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे मी व माझ्या बहिणीने डी.एड.चा पर्याय निवडला नाही. सद्य स्थितीत टीईटी उत्तीर्णतेचे प्रमाण अगदीच अल्प आहे.
-सूर्यकांत जाधव, विद्यार्थी.