पाचव्या दिवशी २४३ मंडळांकडून बाप्पाचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:46+5:302021-09-15T04:35:46+5:30
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने सुरू असलेल्या गणेशोत्सवात पाचव्या दिवशी जिल्ह्यातील एकूण २४३ मंडळांकडून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात ...
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने सुरू असलेल्या गणेशोत्सवात पाचव्या दिवशी जिल्ह्यातील एकूण २४३ मंडळांकडून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यंदा मिरवणुकांवर बंदी असल्याने मंडळांकडून साधेपणाने बाप्पाची आरती करून निरोप देण्यात आला.
यंदा विसर्जनाच्या मिरवणुकांवर बंदी असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व तालीम संघ यांच्याकडून परस्पर प्रकाशाकडे वाहनाने गणेशमूर्ती रवाना केल्या होत्या. यामुळे पाचव्या दिवशी नंदुरबारसह शहादा, तळोदा व नवापूर येथे ढोल, ताशे, डीजे यांचा कुठेही गजर ऐकण्यास मिळाला नाही. नंदुरबारात पाचव्या दिवशी १०० च्या जवळपास गणेश मंडळांकडून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. यातून तालीम संघ मोठ्या मिरवणुका काढतात; परंतु कोरोनामुळे यंदा या मिरवणुका दिसून आल्या नाहीत.
यंदाही चार फूट गणेशमूर्तीची मर्यादा होती. यामुळे मंडळांकडून छोटेखानी मूर्ती स्थापनेला प्राधान्य देण्यात आले होते.
नंदुरबार शहरातील विविध भागांत सकाळपासून गणेशमूर्ती विसर्जनासाठी तयारी सुरू करण्यात आली होती. बहुतांश मंडळांकडून सकाळीच आरती करून बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. सार्वजनिक मंडळांसह घरगुती मूर्तींचे विसर्जन होणार असल्याने लहान मूर्तीही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सोबत नेल्याचे दिसून आले. जिल्ह्यात पाचव्या दिवशी १०७ सार्वजनिक, ८६ खासगी व ५० एक गाव एक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यातील बहुतांश मूर्तीचे विसर्जन हे तापी व गोमाई नदीपात्रात होणार असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे केदारेश्वर मंदिर परिसर घाट, गौतमेश्वर मंदिर परिसर घाट, शहादा शहरातील खेतिया रोड, तळोदाजवळील हातोडा पूल आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शांततेत मूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.