जिल्ह्यात आज पहिल्या टप्प्यातील गणेशमूर्ती विसर्जन, १०० पेक्षा अधिक मंडळे, मिरवणुका निघणार नाहीत यासाठी दक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:35 AM2021-09-14T04:35:34+5:302021-09-14T04:35:34+5:30
पहिल्या टप्प्यात गणेशमूर्ती विसर्जन करणाऱ्या मंडळांची संख्या ही शहादा व नवापूर शहरासह तालुक्यात अधिक आहे. जिल्ह्यात जवळपास १०० पेक्षा ...
पहिल्या टप्प्यात गणेशमूर्ती विसर्जन करणाऱ्या मंडळांची संख्या ही शहादा व नवापूर शहरासह तालुक्यात अधिक आहे. जिल्ह्यात जवळपास १०० पेक्षा अधिक सार्वजिनक गणेश मंडळांतर्फे मूर्ती विसर्जन केले जाणार आहे. दरवर्षी पहिल्या टप्प्यातील गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठी गर्दी असते. शहाद्यात अनेक मोठ्या मंडळांचा त्यात समावेश असतो. यंदा मात्र मिरवणुकाच नसल्यामुळे मंडळांना परस्पर मूर्ती विसर्जनासाठी न्यावी लागणार आहे. काही मंडळे स्वत: मूर्ती विसर्जनासाठी जाणार आहेत तर काही मंडळांकडून मूर्ती संकलन केंद्रात मूर्ती दिली जाणार आहे.
विसर्जन मिरवणुकांच्या मुख्य मार्गावर पोलीस बंदोबस्त राहणार आहे. कुठल्याही मंडळाला मिरवणूक काढण्यास बंदी असून कुणी प्रयत्न केला तर त्याला पोलीस समज देणार आहेत. त्यासाठी त्या त्या मंडळासोबत पोलीस कर्मचारी राहणार आहेत.
गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेक भागात कंटेन्मेंट झोन होते. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या कमी अर्थात १०० च्या आतच होती. यंदा कोरोनाचा कहर कमी असल्याने तसेच अनेक नियम शिथिल असल्याने मंडळांची संख्या वाढली आहे. साडेचारशेपेक्षा अधिक मंडळांनी यंदा नोंदणी केली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर गणेशोत्सवाचा ताण असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. शहरी भागातील मोठ्या मंडळांना एक पोलीस कर्मचारी व एक होमगार्ड पुरविण्यात आले आहेत. मोठी मंडळे व मानाच्या गणपतींच्या ठिकाणी आठ ते दहा कर्मचारी व एक अधिकारी असा बंदोबस्त आहे. जेणेकरून गर्दीवर नियंत्रण राहील हा उद्देश त्यामागे आहे.