लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सोमवारी मतदानाची धामधूम संपल्यानंतर आता सर्वानाच वेध लागले आहे ते निकालाचे. गुरुवारी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार असल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवार आणि त्यांच्या कार्यकत्र्याची धडधड वाढली आहे. तर सामान्य मतदारांमध्ये कोण जिंकून येईल याची उत्सुकता वाढली आहे. प्रशासनाने देखील मतमोजणीसाठी कंबर कसली असून मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.अवघ्या पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सोमवारी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदार व कार्यकत्र्यामध्ये कमालीचा फरक दिसून आला. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये दिसलेला उत्साह, जोश या निवडणुकीत दिसून न आल्याने याचा परिणाम मतदानावर झाला. शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातील एकूण तीन लाख 20 हजार 403 मतदारांपैकी फक्त दोन लाख नऊ हजार 263 मतदारांनी म्हणजेच अवघ्या 65.31 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ज्यात एक लाख सात हजार 877 पुरुष मतदारांचा तर एक लाख एक हजार 385 महिला मतदारांचा समावेश होता. मतदानाची ही घसरलेली टक्केवारी कोणाच्या फायद्याची ठरते हे निकालावरुन स्पष्ट होईल.मतदानाची धामधूम संपल्याने प्रशासन आता मतमोजणीच्या तयारीस लागले आह. शहादा-तळोदा मतदारसंघाची मतमोजणी शहादा येथे तहसील कार्यालय सभागृहात होणार आहे. मतमोजणीसाठी 16 टेबल लावण्यात येणार असून एकूण 25 फे:यात मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक टेबलावर तीन मोजणी अधिकारी, एक सहाय्यक, एक पर्यवेक्षक व एक सूक्ष्म निरीक्षक अशा सहा जणांची टीम असणार आहे. मतमोजणीची सुरुवात पोस्टल मतदानाने होणार असून पोस्टल मतदान मोजून झाल्यावर मतदान यंत्रातील मतमोजणी करण्यात येईल. मतमोजणीसाठी तहसील कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून केवळ ओळखपत्र असणा:यांनाच मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाईल. निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगितले.
शहाद्यात उत्सुकता शिगेला, पैजाही लागल्या मोठय़ा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:59 PM