मिरचीचे अभिनव प्रयोग राबवणारे कृषीभूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 12:00 PM2020-07-01T12:00:13+5:302020-07-01T12:00:20+5:30
भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नियोजनात्मक शेती केल्यास शेती आणि शेतकरी या दोघांनाही चांगलेच दिवस येतील, ...
भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नियोजनात्मक शेती केल्यास शेती आणि शेतकरी या दोघांनाही चांगलेच दिवस येतील, फक्त मेहनतीची तयारी ठेवली पाहिजे़ हे वाक्य आहेत बामडोद ता़नंदुरबार येथील शेतकरी दशरथ गरबड पाटील यांचे़ शासनाच्या कृषी भूषण पुरस्काराने गौरवल्या गेलेल्या दशरथ पाटील यांनी कमीत कमीत खर्चात अधिक उत्पादन घेण्याचे विक्रमच केले आहेत़
नंदुरबार तालुक्याच्या बामडोद या छोट्याशा गावात स्वत:च्या ३० एकर क्षेत्रात मिरची, पपई, केळी आणि टरबूज या पिकांची अभिनव पद्धतीने लागवड करुन अधिक उत्पादन घेण्यावर त्यांनी भर दिला आहे़ कमी पाणी आणि कमी खर्चात शेती कशी फुलवता येईल यासाठी सदैव प्रयत्न ते घेतात़ जास्तीत जास्त ठिबक सिंचनाने पाणी देऊन पिकांचे संगोपन करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो़ पिकांना रासायनिक खतांचा तुटवडा कधीकाळी उद्भवणार म्हणून सेंद्रीय खते, गोमूत्र, निंबोणी अर्क, पंचामृत आदींचा वापर ते अधिक प्रकृर्षाने करतात़
मिरची उत्पादनामुळे नावलौकिक प्राप्त झालेल्या कृषीभूषण दशरथ पाटील यांनी २००८ साली तीन एकर क्षेत्रात आधुनिक पद्धतीने मिरची लागवड केली होती़ त्यासाठी ठिबक सिंचन व बेड पद्धतीचा वापर केला होता़ जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण प्रकल्प त्याकडे पाहिले जात होते़ दरम्यान एकरी ३५० क्विंटल उत्पादन त्यांनी काढले आहे़ त्यांची मिरची उत्पादनातील हा विक्रम पाहून राज्यातील किमान एक हजार शेतकऱ्यांनी बामडोद येथे भेट देऊन माहिती घेतली होती़
नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या शेती प्रयोगांमुळे त्यांचा नावाचा लौकिक झाला आहे़ केळी, पपई, मिरची, टरबूज या पिकांच्या उत्पादनात वाढ करुन कमीत कमी जागेत, कमी खर्चात उत्पादन घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील विविध भागातील अनेक शेतकऱ्यांना मार्ग सापडला आहे़ वर्षभर दशरथ पाटील मार्गदर्शनासाठीही शेतकºयांना भेटी देत असतात़