सिंहसदृश प्राण्याच्या शोधासाठी जीवरक्षक समितीची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:36 AM2021-09-14T04:36:29+5:302021-09-14T04:36:29+5:30
तळोदा : तळोदा शिवारात वावरणाऱ्या बिबट्याची जोडी व सिंहसदृश प्राण्यांचा शोध घेण्यासाठी सोमवारी दुपारी नंदुरबार येथील मानद वन्य जीवरक्षक ...
तळोदा : तळोदा शिवारात वावरणाऱ्या बिबट्याची जोडी व सिंहसदृश प्राण्यांचा शोध घेण्यासाठी सोमवारी दुपारी नंदुरबार येथील मानद वन्य जीवरक्षक समितीने भेट देऊन या जागेची पाहणी केली.
दरम्यान, हे हिंस्र प्राणी ट्रॅप कॅमेऱ्यात चार दिवस होऊनही कैद न झाल्यामुळे पुन्हा आणखी त्या परिसरात तीन कॅमेरे वनविभागाने वाढवले आहेत.
तळोदा शिवार व आजूबाजूच्या परिसरात बिबट्याच्या नर-मादीच्या जोडीसह सिंहसदृश प्राणी तळोदा शहरवासीयांना दर्शन देत असल्यामुळे त्यांची चांगलीच दहशत पसरली आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्या तलावडीजवळ रस्ता ओलांडतानाच दोन पायी फिरणाऱ्या शिक्षकांना अगदी शंभर फुटांवर दिसला होता. त्यामुळे अजूनही नागरिकांमध्ये भीती कायम आहे.
या जंगली श्वापदांच्या बंदोबस्ताबाबत येथील वनविभागालाही जंग जंग पछाडले आहे. सोमवारीही नंदुरबार येथील मानद वन्य जीवरक्षक समितीच्या टीमने तळोदा शिवारातील ज्या ठिकाणी या प्राण्यांचा वावर दिसून आला होता त्या शेताची चौफेर पाहणी केली. अधिकाऱ्यांकडून त्यांच्या पायाच्या ठशांचीही माहिती जाणून घेतली. त्यामुळे येथील सिंहाच्या अस्तित्वाबाबत निश्चित सांगू शकले नाही. या समितीत सागर निकुंभे, कुणाल भावसार, आशिष बारी, गणेश पाटील, विराज बदाने, प्रतीक कदम, वैभव राजपूत, यश वळवी, रत्नदीप बारी, महेश तावडे आदी या पथकामध्ये सहभागी झाले होते.
त्या ठिकाणी पिंजराही लावला
वनविभागाने गुरुवारी बिबट्याची जोडी व सिंहसदृश प्राणी ज्या शेतात शेतकऱ्यांना दिसून आले होते तेथे ट्रॅप कॅमेऱ्यांबरोबरच वनविभागाने सोमवारी पिंजराही लावला. त्यामुळे आता हे हिंस्र प्राणी पिंजऱ्यात अडकतात, की वनविभागाला गुंगारा देतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.