बामखेडा : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे परिसरात अनेक नागरिकांना हिवतापाची लक्षणे दिसून येत आहेत. पावसामुळे पाण्याचे डबके अथवा पाणी साचून त्यात डास तयार होऊन ते डास चावल्याने हिवताप, डेंगी ताप, चिकुनगुनिया आदी आजार होत आहेत. ग्रामीण भागात हिवताप, चिकुनगुनिया, डेंगी तापाच्या रुग्णात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे हिवताप व कीटकजन्य आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे हे आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी व कोणकोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाची अंमलबजावणी करावी याबद्दल आरोग्य विभागामार्फत काही प्रमाणात जनजागृती केली जात असली तरी नागरिकांनी स्वतःचे आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे.
साथीचे आजार व त्याची लक्षणे
हिवताप हा सर्वात जास्त पसरणारा आजार आहे. या आजाराचा प्रसार ॲनाफिलीस डासाच्या मादीपासून होतो. ही मादी स्वच्छ साचलेल्या पाण्यावर अंडी घालते. जसे घराच्या छतावरील मडकी, टाकून दिलेले टायर्स, कप, साचलेले डबके इत्यादी.
लक्षणे रुग्णास कडाडून थंडी वाजणे, थंडीनंतर रुग्णास १०२-१०५ डिग्री सेल्सियसपर्यंत ताप येणे. डोके दुखणे, रुग्ण अर्धवट शुद्धी किंवा बेशुद्ध होणे, ठरावीक कालावधीनंतर ताप चढणे किंवा पुन्हा उतरणे.
डेंगी ताप
डेंगी ताप या आजाराची लागण एडीस इजिप्तीस नावाच्या डासाच्या मादीमार्फत होते. हे डास ओळखण्यासाठी त्याचा काळा रंग व त्याच्या पायावरील पांढरे पट्टे लक्ष वेधून घेतात.
लक्षणे
डोके दुखी, थंडी वाजून ताप येणे, तीव्र सांधे व पाठदुखी, रुग्णास हालचाल करणे अशक्य होणे, क्वचितप्रसंगी रुग्णास ताप येऊन रुग्णाच्या नाका-तोंडाद्वारे रक्त येणे, रुग्ण बेशुद्धावस्थेमध्ये जाणे.
चिकुनगुनिया
या आजाराचा प्रसार एडिस इजिप्ताय नावाच्या डासामार्फत होतो. या डासाची उत्पती स्वच्छ व साठवलेल्या पाण्यात होते.
लक्षणे
ताप येणे, डोके दुखणे, उलट्या व मळमळ होणे, अंगावर पुरळ येणे, सांधे दुखी होणे प्रमुख लक्षणे आहे. हा आजार सर्व वयोगटात आढळून येतो.
कीटकजन्य आजार उद्भवू नये म्हणून शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. उपरोक्त लक्षणे अथवा आजार झाल्यास सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन सल्ला घ्यावा, तज्ज्ञांकडून अथवा फॅमिली डॉक्टरकडून मार्गदर्शन घेऊन इलाज करावा.
-डॉ. योगेश चौधरी, बामखेडा त. त, ता. शहादा