नंदुरबार जिल्ह्यात निवडणुकीमुळे बाजारातील उलाढालही वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:41 PM2017-12-07T12:41:24+5:302017-12-07T12:43:55+5:30
१०० ते ४०० रुपये रोजामुळे शेकडो बेरोजगार हातांना मिळाले काम
आॅनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.७ : निवडणुकीमुळे हजारो हातांना बºयापैकी काम मिळाले आहे. त्यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. परिणामी बाजारातही बºयापैकी चैतन्य आले आहे.
पालिका निवडणूक स्थानिक प्रश्नांवर लढवली जाते. स्थानिक उमेदवार, स्थानिक मतदार यामुळे निवडणुकीत चुरस असते. यंदादेखील मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण झाली असून त्या माध्यमातून आर्थिक चक्रही गतिमान झाले आहे. सध्या शेतीकामे आटोपली असल्याने मजुरांना रोजगार नाही. असे असले तरी गेल्या आठ दिवसांपासून निवडणुकीने बºयापैकी रोजगार मिळवून दिला आहे.
किमान १०० ते ४०० रुपये रोज मिळू लागला आहे. त्यामुळे मजूरवर्गातही समाधानाचे वातावरण आहे. त्या माध्यमातून बाजारातही उलाढाल वाढली आहे.
प्रचारासाठी कार्यकर्ते
प्रचार रॅलीत गर्दी दिसावी यासाठी राजकीय पक्षांतर्फे मोठ्या प्रमाणावर रोजंदारीवर महिला व पुरुषांना आणावे लागत आहे. किमान १०० ते २०० रुपये रोज द्यावे लागत आहे. केवळ घोषणा देणे व मागे फिरणे एवढेच काम करावे लागते. सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळेची मर्यादा असते. काहीजण मध्येच कलटी मारून निघून जात असतात. त्यामुळे पदाधिकाºयांना त्यांना परत आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
कामावर दांडी
दररोज मजुरी करणाºयांना प्रचारासाठी न्यावे लागत आहे. त्यामुळे कामावर मजूर दांड्या मारत आहे. अनेक ठेकेदार यामुळे कमालीचे हैराण झाले आहेत. प्रचार रॅलीत केवळ फिरणे एवढेच काम असते. उमेदवाराकडून नाश्ताची सोय राहत असल्यामुळे बेरोजगार मजुरांचा कल सध्या प्रचार रॅलीतील कामात असल्याचे दिसून येत आहे.
मंडप बुकिंग
जागोजागी प्रचार कार्यालय थाटण्यात आल्याने मंडपवाल्यांना चांगले दिवस आले आहेत. याशिवाय दररोज कुठे ना कुठे कॉर्नर सभा, जाहीर सभा यामुळे माईक सिस्टिम, खुर्च्या, स्टेज, डेस्क, लाईट यांची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे मंडप डेकोरेटर्सचालकांची सध्या चलती आहे.
खाणावळी हाऊसफुल्ल
प्रत्येक उमेदवाराला दररोज किमान १०० कार्यकर्त्यांना आपल्याकडून जेवण द्यावे लागत आहे. याशिवाय प्रभागातील मतदारांसाठीची जेवणावळ वेगळी.
यामुळे हॉटेल्स, खाणावळ, ढाबे सध्या हाऊसफुल्ल आहेत. तेथे नियमित काम करणारे कामगार व वेटरव्यतिरिक्त अतिरिक्त कामगारांना लावावे लागले आहे. या कामगारांनाही दररोज १०० रुपयांपेक्षा अधिक रोज मिळत आहे.
याशिवाय बॅनर्स, स्टिकर, झेंडे बनविणारे, पेंटर्स यांनादेखील रोजगार मिळाला आहे. या सर्व माध्यमातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. हा सर्व पैसा साहजिकच बाजारात येत असल्यामुळे बाजारातील उलाढालही कमालीची वाढली आहे.