महाराष्ट्र राज्य नगर पालिका व महानगर पालिका शिक्षक संघाच्या वतीने दहा टक्के थकीत रक्कम मिळण्यासाठी अनेकदा शिक्षण मंडळ, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परंतु, याबाबत कोणतीही दखल घेतली जात नसल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जहुर पिंजारी यांनी दिली.
वेतन आयोगाच्या फरकाची ९० टक्के रक्कम राज्य सरकारमार्फत नगर परिषद शिक्षण मंडळाला दिली जाते. उर्वरित १० टक्के रक्कम मात्र नगर परिषदेमार्फत शिक्षण मंडळाला दिली जाते.
सरकारमार्फत मिळणारी रक्कम शिक्षण मंडळाला जमा झाली आहे. परंतु, नगर परिषदेमार्फत मिळणारी रक्कम अद्याप मिळाली नाही. नगर परिषद प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेकदा संपर्क करूनही कोणतीच दखल घेतली जात नाही.
कार्यरत व निवृत्त शिक्षकांना १० टक्के रक्कम देण्याचे आश्वासन नगर परिषद प्रशासनामार्फत देण्यात आले होते, परंतु शिक्षक मात्र अद्याप यापासून वंचित आहे.
दहा टक्के रक्कम न मिळाल्यास नंदुरबार नगर परिषद कार्यालयसमोर उपोषण करण्यात येईल, अशा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.