नंदुरबार : जिल्हा कारागृहातून खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा कैदी कचरा टाकण्याच्या बहाण्याने संरक्षक भिंतीवरून पसार झाला होता. उदेसिंग कुशा वसावे (३०), रा. तळोदा असे कारागृहातून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.
उदेसिंग वसावे हा तळोदा पोलिस ठाण्याअंतर्गत खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन काेठडी मिळाल्याने जिल्हा कारागृहात होता. सोमवारी सकाळी साडेसहा ते सात वाजेदरम्यान गृहरक्षक दलाच्या जवानाने सहा कैद्यांना कचरा टाकण्यासाठी नेले होते. यावेळी संधी साधून उदेसिंग वसावे हा कारागृहातील महिला विभागाच्या मागील बाजूने पळाला होता. तटाच्या बाजूला असलेल्या छोट्याशा बोळीतून मार्ग काढून तो संरक्षक भिंतीवर चढून पसार झाला.
घडलेल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तुरुंग अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात एकच धावपळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी सोमवारीच तुरुंग अधिकारी संदीप एकनाथ चव्हाण यांनी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून उदेसिंग कुशा वसावे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पथकांकडून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.