Nandurbar: दुर्गम भागात गाढवे पूर्ण करताहेत घरकुलांचे स्वप्न पूर्ण
By भूषण.विजय.रामराजे | Published: April 12, 2023 06:53 PM2023-04-12T18:53:03+5:302023-04-12T18:53:24+5:30
Nandurbar: तळोदा तालुक्यातील रापापूर ते कुयलीडाबर अशा आठ किलोमीटर दरम्यान रस्ता नसल्याने ग्रामस्थांना आजही तालुका मुख्यालयापर्यंत येण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
- भूषण रामराजे
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रापापूर ते कुयलीडाबर अशा आठ किलोमीटर दरम्यान रस्ता नसल्याने ग्रामस्थांना आजही तालुका मुख्यालयापर्यंत येण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. रस्ता नसला तरी या गावांना शासनाच्या काही योजना मात्र पोहोचल्या आहेत. यातील घरकुल योजनेचा लाभ घेणे ग्रामस्थांसाठी अत्यंत तापदायी ठरत असून घर बांधकामासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी गाढवांचा वापर करून पक्क्या घरांचे स्वप्न ग्रामस्थ पूर्ण करत आहेत.
सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या केलवापाणी, पालाबार, कुवलीडाबर या गावांच्या समस्या सर्वश्रुत आहेत. पिण्याचे पाणी, वीज आणि पक्का रस्ता यांची प्रतीक्षा असलेल्या येथील ग्रामस्थांची सर्वच स्तरातून आश्वासने देत बोळवण केले जात असताना शासनाच्या काही योजनांचा मात्र लाभ मिळत आहे. यातील घरकुल योजनेच्या याद्यांमधील लाभार्थीही येथे आहेत. योजना मंजूर झाल्यानंतर घर बांधणे मात्र या ग्रामस्थांसाठी स्वप्नवत ठरत आहे. रस्ता नसल्याने वाळू, सिमेंट, लोखंड हे साहित्य तळोद्यातून खरेदी होत असले तरीही ते प्रत्यक्षात घरापर्यंत आणण्यासाठी मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
रापापूरपर्यंत खरेदी करून आणलेले साहित्य तेथून गाढवांच्या पाठीवर लादून घरापर्यंत पोहोचत आहे. परंतु, यासाठी चारचाकी वाहनापेक्षा तीनपट अधिक खर्च करावा लागत असल्याने अनेकांचे आर्थिक गणित चुकून घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.आदिवासी लाभार्थींच्या म्हणण्यानुसार वाळू, खडी आणि सिमेंट आणण्यासाठी लागणारा गाढवांचा खर्च हा चारचाकी वाहनाच्या वाहतुकीपेक्षा तीनपट अधिक आहे. गाढव मालक वाढीव पैसे घेत असल्याने आर्थिक बोजा वाढत आहे.