नंदुरबार : जिल्हा परिषदेचा २०१९-२० या वर्षातील ४५ कोटी ८० लाख रुपये खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला़ शनिवारी जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात विशेष सर्वसाधारण सभेत हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला़सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ व्यासपीठावर उपाध्यक्ष सुहास नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, महिला व बालकल्याण सभापती हिराबाई पाडवी, आरोग्य सभापती लताबाई पाडवी, अर्थ समिती सभापती दत्तू चौरे, समाजकल्याण सभापती आत्माराम बागले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे उपस्थित होते़ प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले़ यानंतर सभापती दत्तू चौरे यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले़ यात प्रामुख्याने २०१८-१९ या वर्षाचा सुधारित अर्थसंकल्प त्यांनी मांडला़ यात आरंभीची शिल्लक ५० कोटी ६० लाख, संभाव्य जमा २१ कोटी १९ लाख असा ७१ कोटी ७९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक त्यांनी मांडले़ यासाठी एकूण ४३ कोटी ३० लाख रुपयांच्या संभाव्य खर्चास सभागृहाकडून मंजूरी देण्यात आली़ खर्चाच्या सुधारित तरतूदीत मागासवर्गीयांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी समाजकल्याण विभागाला ५ कोटी ५० लाख, महिलांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी महिला व बालविकास विभागाला २ कोटी ९ लाख, अपंग कल्याणसाठी ७६ लाख, जलयुक्त शिवार अभियानासाठी ३ कोटी ५० लाख, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाठी २ कोटी ५० लाख, जिल्हा परिषदेच्या विविध बाबींच्या खर्चासाठी ४ कोटी ९६ लाख, रस्ते परीरक्षणासाठी ९ कोटी ५० लाख रुपयांना मंजूरी देण्यात आली़२०१९-२० या वर्षासाठी ४५ कोटी २९ लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला़ यात महसूली २५ कोटी २४ लाख, भांडवली १९ कोटी ९० लाख असे खर्चाचे अंदाजपत्रक आहे़ खर्चाच्या तरतूदीत मागासवर्गीयांच्या वैयक्तिक लाभाच्या कल्याणकारी योजनांसाठी १ कोटी १० लाख, महिला व बालविकास विभागाला १ कोटी ४ लाख, अपंग कल्याणसाठी ५६ लाख, नाविण्यपूर्ण योजनेत १ कोटी, कृषी विभागाला ६६ लाख, जिल्हा परिषद विविध खर्च ६ कोटी ४१ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली़अर्थसंकल्पात पंचायत समिती वाढीव उपकर अनुदान, घसारा निधी, ग्रामीण पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती निधी यांचा जमा खर्च मांडण्यात आला़
नंदुरबार जि़प़ चा ७१ कोटी खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 11:40 AM