नंदुरबारात यंदाही ‘निवडक’ शाळांनाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:49 AM2019-02-14T11:49:56+5:302019-02-14T11:50:02+5:30

आरटीई : पालकांमध्ये प्रवेशाबाबत उत्सूकता, शिक्षण विभागाचा जनजागृतीवर भर

In Nandurbar, only 'select' schools prefer schools | नंदुरबारात यंदाही ‘निवडक’ शाळांनाच पसंती

नंदुरबारात यंदाही ‘निवडक’ शाळांनाच पसंती

Next

नंदुरबार : २५ फेब्रुवारीपासून पालकांना ‘आरटीई’अंतर्गत आॅनलाईन प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे़ परंतु मागील काही वर्षांचा अनुभव बघता यंदाही पालकांकडून काही ‘निवडक’ शाळांनाच पसंती मिळणार की काय? असे चित्र आहे़ त्यामुळे शिक्षण विभागाकडून ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे़
२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया २०१९-२०२० ला सुरुवात झाली आहे़ ८ फेब्रुवारीपासून आरटीईअंतर्गत शाळांचे रजिस्ट्रेशन तसेच व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे़ याची अंतीम मुदत २२ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आलेली आहे़ तर पालकांना प्रत्यक्षात आॅनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची मुदत २५ फेब्रुवारी ते ११ मार्चपर्यंत देण्यात आलेली आहे़ त्यामुळे पालकांमध्ये आॅनलाईन शाळा प्रवेशाबाबत कमालीची उत्सूकता दिसून येत आहे़ मात्र बहुतेक पालकांकडून २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांची निवड करताना निवडक शाळांना प्राधान्य देण्यात येत आहे़ त्यामुळे इतर शाळांकडे आरटीईअंतर्गत जागा रिक्त राहत असल्याचे सांगण्यात येत आहे़
२५ टक्के प्रवेश प्रक्रिया पुणे येथील ‘एनआयसी’ सेंटरअंतर्गत चालविण्यात येत आहे़ गेल्यावर्षी जिल्ह्यातील ४७९ जागांसाठी ५७९ आॅनलाईन प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते़ परंतु अ‍ॅडमिशन घेण्यासाठी पालकांकडून नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील ठराविक शाळांनाच प्राधान्य देण्यात आले होते़ २५ टक्केअंतर्गत प्रवेश प्रकिया जिल्ह्यातील ४३ शाळांमध्ये सुरु असतानासुध्दा पालकांकडून केवळ ३ ते ४ शाळांनाच प्राधान्य देण्यात येत असते़ त्यामुळे इतर शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेशाबाबत घरघर असल्याचे दिसून येत आहे़ वर्षानुवर्षे अशा प्रकारे आरटीईअंतर्गत जागा रिक्त राहत असल्याने यामुळे पालक वर्गाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़
मागील वर्षी केवळ १३७ विद्यार्थ्यांचेच प्रवेश
दरम्यान, आरटीई प्रवेश प्रकियेअंतर्गत मागील वर्षी तीन प्रवेश फेऱ्या झाल्या होत्या़ याअंतर्गत केवळ १३७ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले होते़ तर तब्बल ३४२ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांकडून मिळाली़ रिक्त जागांमुळे शिक्षण विभागाला चौथी प्रवेश फेरी घेण्याबाबत कार्यवाही करावी लागली होती़
तर दुसरीकडे, सीबीएसई व इतर शाळा उघडून बरेच दिवस झाल्यावरही आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरुच होती़ त्यामुळे आरटीई आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली होती़
तांत्रिक अडचणींची समस्या
आरटीईअंतर्गत आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबतची कार्यवाही पुणे येथील ‘एनआयसी’ सेंटरकडून होत असते़ अनेक वेळा आॅनलाईन अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणींअभावी व्यत्यय निर्माण होत असतो़ ही परिस्थती केवळ जिल्ह्याचीच नव्हे तर राज्यभरात सारखीच असल्याचे सांगण्यात आले़

Web Title: In Nandurbar, only 'select' schools prefer schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.