नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पबाधितांनी रविवारी सकाळी मणिबेली येथे प्रतीकात्मक स्वरूपात एकत्र येऊन सरदार सरोवर धरणाच्या लोकार्पण सोहळ्याला विरोध केला.बुडितात आलेल्या महाराष्ट्राच्या ३३ गावांतील प्रतिनिधींनी नर्मदा आंदोलनाच्या नेतृत्त्वाखाली सकाळी एकत्र येत प्रकल्पात बुडालेले महाराष्ट्रातील पहिले गाव मणिबेली येथे पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळा पाण्यात बुडविला. आंदोलक घोषणा देत सरदार सरोवर धरणाकडे गेले. प्रकल्पबाधितांनी नर्मदा बचाओ, मानव बचाओ, माँ नर्मदा को बहने दो आदी घोषणा त्यांनी दिल्या.राज्यातील जवळपास १०० घोषित कुटुंबांना जमीन मिळणे बाकी आहे. टापू सर्व्हेक्षणाच्या वेळी बुडितात आढळून आलेल्या २२६ कुटुंबांना मदतीची प्रक्रिया अपूर्ण आहे. भूसंपादन व ३०० कुटुंबांचे स्थलांतर बाकी आहे. मुळ गाव व पुनर्वसन वसाहतींना मूलभूत नागरी सोयीसुविधा मिळालेल्या नसताना धरणाचे गेट बंद करण्यात आले, अशी टीका आंदोलकांनी केली.आदिवासींना पाचव्या अनुसूचित विशेष अधिकार दिले आहेत. पेसाचा कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. नर्मदा पाणी तंटा लवाद, महाराष्ट्र शासनाने घेतलेले निर्णय धाब्यावर बसवून एकतर्फी निर्णय घेतला जात आहे. पुनर्वसन बाकी असताना लोकार्पण करणे म्हणजे प्रकल्पबाधितांची थट्टा असल्याचा आरोप नुरजी पाडवी यांनी केला.>महाराष्ट्रातील बुडितात जाणारे पहिले गाव मणिबेली येथे रविवारी सकाळी पंतप्रधानांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जलसमाधी देण्यासाठी घेऊन जाताना प्रकल्पबाधीत व आंदोलक.
नर्मदा आंदोलकांचे मणिबेली येथे आंदोलन, पंतप्रधानांचा प्रतीकात्मक पुतळा पाण्यात बुडविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 5:18 AM