स्वच्छ विद्यालयाचा राष्ट्रीय पुरस्कार कोठली शाळेला
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: August 19, 2017 12:26 PM2017-08-19T12:26:33+5:302017-08-19T12:26:57+5:30
मेहनतीला फळ : आश्रमशाळेत आनंदोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय स्वच्छ विद्यालयाचा पुरस्कार कोठली, ता.नंदुरबार येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेस जाहीर झाला आहे.
नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत कोठली आश्रमशाळेने गेल्याच वर्षी आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त केले होते. अशा प्रकारचे प्रमाणपत्र प्राप्त करणारी ही राज्यातील पहिली आश्रमशाळा ठरली होती. याशिवाय इतरही विविध उपक्रमात शाळेने आघाडी घेतली होती. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी दीड वर्षापूर्वी कोठली आश्रमशाळा दत्तक घेतल्यानंतर या शाळेत गुणवत्तेसह भौतिक व शैक्षणिक सुविधा विद्याथ्र्याना मिळाल्या. शाळेने केंद्राच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय उपक्रमात सहभाग घेतला होता. देशभरातील 172 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. त्यात नंदुरबार जिल्ह्यातून कोठली शासकीय आश्रमशाळेचा समावेश आहे. सकाळी ही माहिती मिळताच शाळेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक ए.जे.पाडवी यांचा यावेळी विद्यार्थीनी आणि शिक्षकांनी गौरव केला