ना ढोल, ना ताशा विसर्जनप्रसंगी ‘मोरया मोरया’चा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:33+5:302021-09-15T04:35:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे. पाचव्या दिवसाच्या गणरायाचे मंगळवारी भक्तीमय वातावरणात विसर्जन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे. पाचव्या दिवसाच्या गणरायाचे मंगळवारी भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. या वेळी पाऊसा ने थोडीशी उघडीप दिल्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साह संचारला होता. या वेळी आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला. कोरोना नियमांचे पालन करत ना ढोल, ना ताशे, ना बँजो, ना डीजे, ना मिरवणूक, ना गुलाल फक्त गणपती बाप्पा मोरया मोरयाच्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला.
दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून प्रकाशा गाव प्रसिद्ध आहे. गणपती विसर्जनासाठी केदारेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर व गौतमेश्वर मंदिर परिसरात दरवर्षी विसर्जनासाठी भाविक गर्दी करीत असतात. मात्र, या वर्षी तापी नदी घाटावर बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी पावसाने उघडीप दिल्याने गणेश भक्तांनी समाधान व्यक्त केले. सकाळी ढगाळ वातावरणामुळे काही गणपती डोक्यावरून, हातगाडी, चारचाकी, तीन चाकी, टेम्पो, घरगुती वाहनातून गणेश मूर्ती विसर्जनासाठी भाविक गौतमेश्वर मंदिर प्रांगणात येताना दिसलेत.
याप्रसंगी कोणतीही वाजंत्री लावण्यात आलेली नव्हती. शांततेत गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत विसर्जन ठिकाणी गणेश भक्तांनी गणरायाला आणले. याप्रसंगी गणेशभक्तांनी अत्यंत शांत व साधेपणाने उत्सवाची सांगता केली. उत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी १४ सप्टेंबर रोजी पाचव्या दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी शेकडो गणेश मूर्ती या घरगुती व गावतील मंडळ आणि पर गावतील मुर्त्या सकाळी अकरा वाजेपासून विसर्जन स्थळी यायला सुरूवात झाली होती.
गावातील नवयुवक गणेश मंडळाने दुपारी बारा वाजाता गणेश विसर्जन केले. गणेश विसर्जनासाठी प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमावलीचे नागरिक पालन करताना दिसून आलेत.
तापी नदी घाटावर पोलिसांनी बंदी घातली होती. त्यामुळे अनेक गणेश मंडळांनी तापीनदी पुलावरूनच गणेश विसर्जन केले. तर गावतील सहा गणेश मंडळ हे गौतमेश्वर मंदिर परिसरात आले होते. येथे देखील गोमतीनदी पुलावरून तर काही भाविकांनी होडीच्या सहाय्याने नदीच्या मधोमध जावून गणरायाला निरोप दिला. पोलिसांचा चोख बंदोबस्त
केदारेश्वर मंदिर परिसर तसेच तापी नदी घाटावर व गौतमेश्वर मंदिर परिसरामध्ये पोलिसांनी आपला चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित घडू नये याकडे ते लक्ष ठेवून होते.
प्रकाशा महसूल विभाग गौतमेश्वर घाटावर
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहादा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे मंडळाधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी बी.ओ. पाटील, ग्रामसेवक बाळू पाटील, आदी आपल्या सहकाऱ्यांसह गौतमेश्वर मंदिराचा विसर्जन ठिकाणी दिवसभर थांबून होते व त्यांनीच आपत्ती व्यवस्थापनाची बोट व पट्टीचे पोहणारे सीताराम भगत यांच्यासह १२ लोकांची टीम सज्ज ठेवली होती.