पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्याला पाच हजारांची लाच घेताना अटक
By मनोज शेलार | Published: June 19, 2023 05:18 PM2023-06-19T17:18:19+5:302023-06-19T17:18:55+5:30
भय्यासाहेब दिगंबर निकुंभे (५३) विस्तार अधिकारी, पंचायत समिती, नंदुरबार असे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
नंदुरबार : शेतात रोहयोंतर्गत विहिरीचा प्रस्ताव मंजूर करून अनुदान काढून देण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना नंदुरबार पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
भय्यासाहेब दिगंबर निकुंभे (५३) विस्तार अधिकारी, पंचायत समिती, नंदुरबार असे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. रनाळे खुर्द येथील शेतकऱ्याने त्याच्या शेतात रोहयोंतर्गत विहीर मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता. तो मंजूर करावा व अनुदान काढण्यासाठी निकुंभे यांनी शेतकऱ्याकडून पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
सोमवार, १९ रोजी पंचायत समिती कार्यालयाबाहेर चहाच्या टपरीवर पाच हजार रुपये स्वीकारताना निकुंभे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलिस निरीक्षक समाधान वाघ, हवालदार विजय ठाकरे, विलास पाटील, ज्योती पाटील, संदीप नावाडेकर, देवराम गावित, मनोज अहिरे, अमोल मराठे, जितेंद्र महाले यांनी केली.