पाकीट उचलणा-याचा पोलीसाने केला पाठलाग, चालकाचे पैसे केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 01:54 PM2021-01-27T13:54:48+5:302021-01-27T13:55:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भाचीचा विवाहासाठी कुटुंबासह गावी जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला एकाचे रस्त्यात पडलेले पाकीट दिसून आले. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भाचीचा विवाहासाठी कुटुंबासह गावी जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला एकाचे रस्त्यात पडलेले पाकीट दिसून आले. या पाकिटाजवळ पोहोचणार तेवढ्यात दुसऱ्याने ते उचलून घेत पळ काढला. पोलीस कर्मचाऱ्याने त्याचा थेट १५ किलोमीटर पाठलाग करत त्याच्याकडून पाकीट घेत ते मूळ मालकाला परत केल्याची घटना नंदुरबारात घडली.
२४ जानेवारी रोजीच्या या घटनेनंतर संबंधित चालकाला बोलावून त्याचे पाकीट सोमवारी परत देण्यात आले. याबाबत अधिक असे की, उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले संजय प्रतापसिंग वळवी हे २४ रोजी सकाळी भाचीच्या विवाह सोहळ्यासाठी तळोद्याकडे जात होते. दरम्यान, राकसवाडा चाैफुलीवर काहीतरी खाली पडलेली प्लास्टिक वस्तू उचलून एकजण ती न्याहाळत असल्याचे दिसून आले. संजय वळवी यांनी त्यास आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला असता, पिशवी उचलत संबधिताने दुचाकीने पळ काढला. पोलीस कर्मचारी वळवी यांच्यासोबत कुटुंब असतानाही त्यांनी दुचाकी संबंधिताचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, १५ किलोमीटरवर वाका चाररस्ता गावाजवळ पिशवी उचलणाऱ्यास त्यांनी थांबवत विचारणा केल्यावर घाबरून गेल्याचे त्याने सांगितले. कर्मचारी वळवी यांनी पिशवी तपासली असता त्यात वाघोदा येथे ट्रॅक्टरचालक असलेल्या सागर नाईक याचे ड्रायव्हिंग लायसन्स, इतर कागदपत्रे व १५ हजार रुपये आढळून आले. वळवी यांनी ते घेत भाचीच्या विवाह सोहळ्यात हजेरी लावली. सोमवारी परत आल्यानंतर सागर नाईक याचा शोध घेत त्याला पैशांचे पाकीट परत केले.
हरवलेले पैसे परत मिळाल्याने सागर नाईक यालाही गहिवरून आले होते. वळवी यांच्या प्रामाणिकपणाचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.