कहाटूळ ते सोनवद रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:36 AM2021-09-14T04:36:14+5:302021-09-14T04:36:14+5:30
शहादा तालुक्यातील कहाटूळ ते सोनवद दरम्यानचे अंतर पाच किलोमीटरचे आहे. या रस्त्याचे काम चार वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झाले ...
शहादा तालुक्यातील कहाटूळ ते सोनवद दरम्यानचे अंतर पाच किलोमीटरचे आहे. या रस्त्याचे काम चार वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झाले आहे. त्याआधी हा रस्ता जिल्हा परिषदेकडे होता. सध्या हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना आपले वाहन क्रॉसिंग करण्याच्या वेळेस अपघातसदृश स्थिती निर्माण होते. मागील वर्षी याच रस्त्यावर मोठा अपघातही झाला होता. तरीही या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अद्याप झालेले नाही. समोरून वाहन येत असल्यास खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याची स्थिती निर्माण होते. रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे दुचाकीस्वार जखमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
कहाटूळ ते सोनवद या मार्गावरून जयनगर, कोंढावळ, वडाळी, निंभोरे, धांद्रे, लोंढरे, उजळोद या गावांतील ग्रामस्थांना शहादा येथे जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा चालू असते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहादा आगारातील जयनगर तसेच कहाटूळ येथे येणाऱ्या बसेस चालू नसल्यामुळे या मार्गावर अवैध वाहतूक वाढली आहे. शिवाय शहादा तसेच लोणखेडा येथे महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी दुचाकीचा वापर करीत आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे.
या रस्त्यावरून शहादा येथे किराणा दुकान, मार्केटिंगची कामे, सरकारी नोकरदार, लोणखेडा येथे सूतगिरणीत कामासाठी जाणाऱ्या लोकांची नेहमी ये-जा असते. त्यामुळे सकाळपासून ते रात्रीपर्यंत या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. परंतु रस्त्याची दुरवस्था झाल्याने सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे भविष्यात होणारा मोठा अपघात टाळण्यासाठी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून आजूबाजूला वाढलेली काटेरी झुडपेही तोडण्याची मागणी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी केली आहे.