प्रकाशा येथे तापी पात्रात युवक वाहून गेला, उत्तर कार्याच्या विधीप्रसंगी घडली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:35 AM2021-09-14T04:35:58+5:302021-09-14T04:35:58+5:30
सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस स्मशानभूमीच्या जवळ तापी घाटावर नातेवाईकांसह दोन्ही भाऊ आजोबांच्या उत्तर कार्याच्या ...
सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस स्मशानभूमीच्या जवळ तापी घाटावर नातेवाईकांसह दोन्ही भाऊ आजोबांच्या उत्तर कार्याच्या विधीसाठी गेले होते. मुंडण केल्यानंतर राज व गौतम हे तापी पात्रात अंघोळीसाठी गेले होते. यावेळी गौतम याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. त्यावेळी राज हा त्याला वाचविण्यासाठी पुढे सरकला असता त्याचाही पाय घसरून पाण्याच्या वेगवान प्रवाहात तो वाहून गेला. यावेळी गौतमला वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले. त्याला तातडीने आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तापीच्या अथांग पाण्यात मात्र राज सापडला नाही. गावातील पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले. पात्रात राज याचा शोध घेतला असता तो सायंकाळी उशिरापर्यंत मिळून आला नव्हता. राज ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. शहादा पोलिसात सायंकाळी उशिरा नोंद करण्यात आली. तपास जमादार सुनील पाडवी, हवालदार रामा वळवी, विकास शिरसाठ, अजित नागलोद हे करीत आहेत.