रमाकांत पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी भागातील कल्पवृक्ष म्हणून परिचित असलेल्या महुपासून सॅनिटायझर बनविण्याचा प्रयोग मध्यप्रदेश सरकारने केला आहे. याच धर्तीवर महाराष्टÑ शासनानेही हा प्रकल्प राबवून सध्याच्या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत उपाययोजनांसाठीही त्याचा वापर होऊ शकतो व शेकडो हातांना त्यातून रोजगारही उपलब्ध होणार आहे.महूचे वृक्ष अनेक आजारांवर रामबाण मानले जाते. विशेषत: आदिवासी संस्कृतीत माणासाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या विविध संस्कारात त्याचा वापर वेगवेगळ्या माध्यमातून होतो. सातपुड्यात महूचे हजारो वृक्ष असून, दरवर्षी हंगामात महूचे फुल अनेकांना रोजगार देत असते. या महुचा वापर अजून एका गुणकारी रसायनासाठी होवू शकतो. सध्याच्या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत संरक्षणासाठी अनेक प्रकारचे सॅनिटायझर बाजारात आले आहेत. त्यांच्या किमती सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्या तरी या परिस्थितीत ती आवश्यक बाब झाल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला आहे. नव्हे तर बाजारात अधून मधून त्याची टंचाईही जाणवत असल्याचा अनुभव लोकांनी घेतला.या पार्श्वभूमीवर महूपासून सॅनिटायझर बनविण्याचा प्रायोगिक प्रकल्प मध्यप्रदेशातील धामणदा येथील श्रीहरि आजीविका स्वयंसहाय्यता बचत गटाने राबविला आहे. हा प्रयोग त्यांचा यशस्वी झाला असून, महूच्या अर्कापासून ते बनविले जात आहे. महाराष्ट्रातील सिमेला लागून असलेल्या सातपुड्याच्या मध्यप्रदेशातील गावात हा प्रयोग राबविण्यात आला आहे. महाराष्टÑातही राबविणे तो शक्य आहे. सध्या महुचा हंगाम सुरू झाला असून, महूचे वृक्ष बहरले आहे. तसेच याच काळात शासनानेही रोजगार हमी योजनेच्या कामांना गती दिली आहे. स्थानिक मजूर रिकाम्या हाती आहेत. शिवाय स्थलांतरीत मजुरांनाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महूपासून सॅनिटायझरचा प्रकल्प झाल्यास त्यातून अनेकांना रोजगारही मिळू शकतो. शिवाय रोजगार हमी योजनेवर जाणाऱ्या मजुरांसाठी कोरोनापासून संरक्षणाकरीता हे सॅनिटायझर वापरण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही अशा प्रयोगाला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे़ त्यासाठी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे़महूपासून सॅनिटायझर बनविता येत असेल तर महाराष्टÑातही असे प्रयोग राबविण्यास हरकत नाही. सातपुडा आणि महाराष्टÑातील इतर भागात महूचे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे आपण सुद्धा प्रायोगिक तत्वावर नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या भागात तो राबविण्याचा विचार करू शकतो. त्यासाठी प्रकल्पाधिकारी व तज्ञांना या संदर्भात अधिक माहिती आणि अभ्यास करण्यासाठी आपण सूचना करणार आहोत.-अॅड.के.सी. पाडवी, मंत्री आदिवासी विकास विभाग,महाराष्टÑ शासन मुंबई.
महुपासून सॅनिटायझर बनविण्याच्या प्रकल्पाला चालना हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 9:10 PM