खडकला घाटातील रस्त्याची संरक्षक भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:35 AM2021-09-14T04:35:43+5:302021-09-14T04:35:43+5:30

या संरक्षक भिंतीचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करीत लोखंडाच्या वापर अगदी कमी करुन मातीमिश्रित वाळू वापरण्यात आले. बांधकामात मोठमोठे ...

The protective wall of the road in Khadkala Ghat collapsed | खडकला घाटातील रस्त्याची संरक्षक भिंत कोसळली

खडकला घाटातील रस्त्याची संरक्षक भिंत कोसळली

googlenewsNext

या संरक्षक भिंतीचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करीत लोखंडाच्या वापर अगदी कमी करुन मातीमिश्रित वाळू वापरण्यात आले. बांधकामात मोठमोठे दगड-गोटे वापरून बांधकाम केल्याने व आवश्यक प्रमाणात पाण्याचा वापर केला नसल्याने ही संरक्षण भिंत एक वर्षदेखील टिकू शकली नाही. त्यामुळे या भिंतीच्या बांधकामाविषयी शंका उपस्थित होत आहे. या कामाची चौकशी होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरु असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, भविष्यात मोठ्या घटनांना आमंत्रण देण्याचे काम ठेकेदार व संबंधित अधिकारी करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

धडगावहून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकला खुर्द ते चोंदवाडा बुद्रुक- खडकला बुद्रुक ते बोदला या गावांना जोडणारा १४.५८० किलोमीटरच्या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरु आहे. मात्र रस्त्याचे काम आठ वर्षे उलटूनही पूर्ण झाले नाही. या रस्त्याचे काम सुरू करण्याची तारीख २० एप्रिल २०१३ होती व काम पूर्ण करण्याची मुदत १९ ऑक्टोबर २०१४ पर्यंत होती. मात्र सात वर्षे होऊनही या रस्त्याला पूर्ण होण्याचा मुहूर्त मिळालेला नाही. यामुळे परिसरातील वाहनधारक व नागरिकांची गैरसोय होत आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून कासवगतीने काम सुरु हे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. झालेले कामही गुणवत्तापूर्ण झाले नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अर्धवट व निकृष्ट कामामुळे वाहनचालक व ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी वाहन चालविणे म्हणजे धोकादायक ठरत आहे. अनेक वेळा मोटासायकल अपघाताच्या घटना घडतात. रस्त्याच्या कोणत्याही वळणावर वाहन पास होत नसल्याने एका रोडरोलर चालकाला जीवही गमवावा लागला आहे. भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र धडगाव येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.

संरक्षण भिंत कोसळल्यामुळे मोठमोठे दगड रस्त्यावर पडल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. जिथे धोकादायक स्थिती आहे त्याच ठिकाणी रस्त्याचे बांधकाम अर्धवट आहे. पुलाचे व संरक्षण भिंत बांधण्याचे काम झाले. परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने गुणवत्ता तपास पथकाने या रस्त्याची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी होत आहे. रस्त्याच्या कामाला होणारा विलंब व निकृष्ट कामाची चौकशी होऊन संबंधित अधिकारी व ठेकेदारावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.

या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. झालेल्या कामात मातीमिश्रित वाळू, लोखंडाचा वापर नाही, मोठमोठे दगड-गोटे वापरून बांधकाम पूर्ण केल्यानंतर पाणीही टाकण्यात आले नाही. वेळोवेळी आम्ही संबंधित अधिकारी व ठेकेदाराला याबद्दल विचारणा केली असता आम्हाला योग्य उत्तरे मिळाली नाही. या रस्त्याच्या कामाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

-दीपक पावरा, ग्रामस्थ, खडकला बुद्रुक, ता. धडगाव

Web Title: The protective wall of the road in Khadkala Ghat collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.