शहादा (नंदुरबार) : शेतातील उभ्या पिकांचे नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. लाखोंचे नुकसान होऊनही आरोपींना पकडले जात नाही. याच्या निषेधार्थ शहाद्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रोश मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले.
शहादा तालुक्यात गेल्या काही दिवसांत केळी, पपई व इतर पिकांचे अज्ञात लोकांकडून नुकसान केले जात आहे. केळीची झाडे कापून फेकली जात आहे. शेती साहित्यही चोरले जात आहे. लाखोंचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पोलिसात तक्रार करूनही पोलिसांकडून आरोपींना पकडण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी आक्रोश मोर्चा काढला. प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याबाबत ठोस भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या वेळी देण्यात आला. मोर्चात महिला शेतकरीदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.