रघुवंशींचे पालकमंत्र्यांवर पुन्हा एकदा ‘फायर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:35 AM2021-09-12T04:35:06+5:302021-09-12T04:35:06+5:30
नंदुरबार : राज्यात काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार असले तरी जिल्ह्यात मात्र सोयीच्या राजकारणाची परंपरा कायम सुरू आहे. ...
नंदुरबार : राज्यात काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार असले तरी जिल्ह्यात मात्र सोयीच्या राजकारणाची परंपरा कायम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी सार्वजनिक राजकारणातील भूमिका मात्र वेगळी असल्याचे चित्र गेल्या दीड वर्षात पाहायला मिळाले. नुकताच अक्कलकुवा येथे शिवसेनेच्या झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना मंत्रिपद दिल्याने जिल्ह्याचे नुकसान झाल्याचा आरोप करून इतरही आरोपांची तोफ डागली. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
अक्राणी विधानसभा मतदार संघातून सलग आठवेळा विजयी झालेले ॲड. के. सी. पाडवी यांचे राजकारण हे नेहमीच जिल्ह्याच्या राजकारणाच्या प्रवाहापेक्षा वेगळे राहिले आहे. ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक हे वयोमानाने थकल्याने राजकारणापासून अलिप्त झाले. त्यातच गेल्या निवडणुकीपूर्वी झालेल्या राजकीय उलथापालथीत काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसचे राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणात ॲड. के. सी. पाडवी हे प्रभावी ठरले आहेत. साहजिकच राज्यात सत्ता आल्यानंतर त्यांना आदिवासी विकास विभागाच्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारीही काँग्रेसने दिली आहे. अतिशय संयमी, आरोप-प्रत्यारोपापासून लांब आणि मितभाषी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे आपल्या मतदार संघात त्यांचा प्रभाव कायम आहे. परंतु रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अक्राणी मतदार संघावर आता शिवसेनेचा डोळा आहे. गेल्या निवडणुकीतही शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली होती. त्यात काँग्रेसने अर्थात ॲड. पाडवी यांनी विजय मिळवला असला तरी शिवसेनेला मिळालेले मताधिक्क्यही बऱ्यापैकी असल्याने आता शिवसेनेला तेथील जागेची आस लागून आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी झाली असली तरी किमान शिवसेना आणि मंत्री ॲड. पाडवी यांचा मात्र अंतर्गत संघर्ष सुरूच आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने तोरणमाळ जिल्हा परिषद गटात ॲड. पाडवी यांना धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना सातत्याने त्यांच्यावर वार करण्याची संधी सोडत नाही. नुकताच अक्कलकुवा येथे शिवसेनेचा मेळावा झाला. त्यात चंद्रकांत रघुवंशी यांनी मंत्री ॲड. के. सी. पाडवी आणि त्यांच्या आदिवासी खात्यावरच प्रहार केला. या मेळाव्यात काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. अर्थातच काँग्रेस आणि शिवसेनेचा वाद या माध्यमातून चव्हाट्यावर आला आहे. एरव्ही देखील अधूनमधून शिवसेना, काँग्रेस आणि ॲड. पाडवी यांच्यावर सातत्याने काही ना काही आरोप करीत आले आहेत. १५ दिवसांपूर्वीच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत तोरणमाळ विकासाबाबत ऑनलाईन बैठक झाली. वास्तविक तोरणमाळ हे ॲड. के. सी. पाडवी यांच्या मतदार संघातील असल्याने शिवाय ते जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांची या बैठकीला उपस्थिती आवश्यक होती. मात्र, ते बैठकीत दिसले नाहीत. त्यावरून स्थानिक पातळीवर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, या सर्व वादापासून मंत्री ॲड. पाडवी हे अलिप्त राहिले. कुठलीही प्रतिक्रिया त्यांनी आपल्या स्वभावानुसार व्यक्त केलेली नाही. आपल्या कामाचाही कधी त्यांनी गवगवा केलेला नाही. त्यांच्या या शांत आणि संयमी स्वभावामुळे जिल्ह्याच्या राजकारणातही शांतता असली तरी शिवसेनेच्या या आरोपांवर ते कसे उत्तर देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.