लसीचे वेस्टेज कमी; प्रत्येकाला डोसची हमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:29 AM2021-09-13T04:29:02+5:302021-09-13T04:29:02+5:30
नंदुरबार : कोरोना लसीकरणासाठी आवश्यक एडी सिरिंजचा राज्यात तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे; परंतु नंदुरबार जिल्ह्यात येत्या १० ...
नंदुरबार : कोरोना लसीकरणासाठी आवश्यक एडी सिरिंजचा राज्यात तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे; परंतु नंदुरबार जिल्ह्यात येत्या १० दिवस पुरतील एवढ्या एडी सिरिंज उपलब्ध आहेत. येत्या काळात सिरिंजचा तुटवडा भासू नये यासाठी लसीसोबत सिरिंजची मागणीही जिल्हा आरोग्य विभागाने यापूर्वीच केली असल्याने तुटवड्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे.
कोरोना लसीकरणासाठी एडी सिरिंजचा वापर केला जातो. जेवढ्या लसीच्या कुपी पाठवल्या जातात, तेवढ्याच एडी सिरिंजही वापरात येतात. जिल्ह्यात आजघडीस २० हजार लसीचा साठा उपलब्ध असल्याने तेवढ्याचा प्रमाणात एडी सिरिंजही उपलब्ध असल्याने तुटवडा निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होणे सध्या तरी शक्य नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी आधीच आरोग्य विभागाने राज्यस्तरावर मागणी नोंदवून ठेवली आहे. येत्या काळात सिरिंज साठा संपल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून लहान बालकांच्या लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या ०. ५ मिली, १ मिली सिरिंज वापरल्या जाऊ शकतात; परंतु सध्या तरी तसे करण्याची वेळ जिल्हास्तरावर येणार नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
काय आहे एडी सिरिंज?
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी एडी सिरिंज वापरली जाते. कुपीतून ५ मिली लिक्विड व्हॅक्सिन ओढल्यानंतर ही सिरिंज ऑटो लॉक होते. त्यामुळे एक कुपीतून ११ ते १२ डोस दिले जातात. एका डोससाठीच सिरिंजचा वापर केला जातो. आरोग्य विभागाकडून डोस तेवढेच सिरिंज दिल्या जात आहेत.
२ सीसी सिरिंज वापरावी..!
एडी सिरिंजचा तुटवडा असलेल्या जिल्ह्यांमध्ये २ सीसी सिरिंज वापरण्यात येत आहेत. लहान बालकांच्या नियमित लसीकरणासाठी या सिरिंजचा वापर केला जातो. जाड असणाऱ्या या सिरिंजचा वापर करण्याची सवय जिल्हा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना आहे. यामुळे डोस वाया जाण्याचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज आहे.
सध्या जिल्ह्यात लसीचे ८ हजार ५०० डोस शिल्लक आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सुमारे १० हजार ५०० डोस आहेत. जेवढे डोस आहेत, तेवढेच सिरिंज हे लसीकरण केंद्र व पाईपलाईन अशा दोन्ही ठिकाणी असल्याची माहिती देण्यात आली आहे.
वेस्टेज कमी
जिल्ह्यात आतापर्यंत वापरल्या गेलेल्या एडी सिरिंजमधून १० पेक्षा अधिकचे डोस दिले गेले असल्याचे सांगण्यात आले आहे. यातून जिल्ह्यात वेस्टेज डोस व एडी सिरिंजचे प्रमाण हे नगण्य असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे केंद्रांवर प्रत्येकाला डोस मिळत आहे.
सध्या पुरेशा एडी सिरिंज उपलब्ध आहेत. पुढील काळात सिरिंज उपलब्ध झाल्या नाहीत, तर पर्यायी व्यवस्था म्हणून एक लाख सिरिंजची मागणी नोंदवली आहे. त्या सिरिंज येत्या काळात प्राप्तही होणार आहेत. यामुळे जिल्ह्यात तुटवडा भासणार नाही.
- डॉ. महेंद्र चव्हाण,
जिल्हा लसीकरण अधिकारी.