पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तळोदा पंचायत समितीचे तत्कालीन कनिष्ठ सहायक ए.जी. भावसार यांनी सन २०१८ मध्ये इतरत्र बदली झालेल्या जिल्हा परिषद शाळेतील दोघा प्राथमिक शिक्षकांचे साधारण एक लाख १२ हजार रुपये वेतन काढले होते. त्याचबरोबर एका शिक्षकाची देखील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच वेतनवाढ बंद केली होती. तरीही शिक्षण विभागाची दिशाभूल करून त्या शिक्षक कर्मचाऱ्याची वेतनवाढ लावून दिली होती. विशेष म्हणजे त्याचे पंचायत समितीने एक ते चार परिशिष्ट भरलेले असताना वेतनवाढ लावल्याचा कारनामा केल्यामुळे याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेवून याबाबत चौकशी करण्याची सूचना पंचायत समिती प्रशासनास देण्यात आली होती. त्यानुसार यंत्रणेने सविस्तर चौकशी केल्यानंतर तसा अहवाल तळोदा पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २८ ऑगस्ट रोजी सादर करण्यात आला आहे. हा अहवाल सादर होवून आता जवळपास १५ दिवस झाले आहेत. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यावर जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्याची गेल्यावर्षीच ऑगस्ट महिन्यात शहादा पंचायत समितीत बदली झाल्याचे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले आहे.
शिक्षकांची सेवापुस्तिकेही अपूर्ण
पंचायत समितीतील इतर शिक्षकांची सेवा पुस्तके, रजा, वेतनवाढ अशी नियमित कामेही अपूर्ण ठेवण्यात आली होती. त्याचबरोबरच बिलांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करतानाही खोडसाळपणा केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्याचे एक ते चार परिशिष्ठ भरले असल्याचेही पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले.
सबंधित कर्मचाऱ्याबाबत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने चौकशी करून अहवाल मागवला होता. त्यानुसार गेल्या महिन्यात अहवाल सादर करण्यात आला आहे.
-रोहिदास सोनवणे, सहायक गटविकास अधिकारी, पं.स. तळोदा