लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाची लागण झालेल्या शिक्षिकेच्या संपर्कात आलेल्या चारही संशयितांचे स्वॅबचा अहवाल शनिवारी निगेटीव्ह आल्याने तळोदेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून चिंता कमी झाली आहे.तळोदा येथील उर्दू शाळेत अक्कलकुव्याहून ये-जा करणाऱ्या शिक्षिकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. शालेय पोषण आहार वाटपासाठी या शिक्षिकेने इतर चार शिक्षकांची मदत घेतल्याने ते थेट संपर्कात आले होते. त्यामुळे येथील आरोग्य विभागाने या चार जणांबरोबरच इतर चार जणांना आमलाड येथील विलगीकरण कक्षात क्वारंटाइन केले आहे. या सर्वांचे स्वॅब तीन दिवसांपूर्वी नंदुरबार येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील चार जणांचे म्हणजे जे थेट पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आले त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने तळोदेकरांची चिंता कमी झाली आहे. उर्वरित चार जणांचा थेट संपर्क नव्हता. त्यामुळे ही दिलासादायक बाब आहे. आरोग्य विभागाने उर्दू शाळा परिसरातील ८७ कुटुंबातील ३७५ जणांची आरोग्य तपासणी केली होती. सुदैवाने त्यात एकालाही ताप, खोकला, सर्दी, श्वसनविकाराचे लक्षणे आढळून आली नव्हती. मात्र खबरदारी म्हणून नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तळोद्यातील ‘त्या’ चारही जणांचे अहवाल निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 1:57 PM