सारंगखेडा यात्रेत चार दिवसात एक कोटींच्या घोड्यांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:50 AM2017-12-08T11:50:01+5:302017-12-08T11:55:32+5:30
देशभरातील शेकडो पर्यटकांनीही घेतला चेतक फेस्टिवलचा आनंद
आॅनलाईन लोकमत
सारंगखेडा,दि.८ : एकमुखी दत्त आणि घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रोत्सवात यंदा तीन परदेशी पर्यटकांनी हजेरी लावली़ तसेच दर दिवशी देशभरातील शेकडो पर्यटक येथे येऊन चेतक फेस्टिवलचा आनंद लुटत आहेत़ यात्रोत्सवाच्या चार दिवसात अश्व प्रदर्शनात तब्बल १ कोटी १९ लाख ८२ हजार ७०० रुपयांची घोड्यांची विक्री झाल्याने नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
ओलांडला एक कोटी रुपयांचा टप्पा
सारंगखेडा येथील घोडेबाजाराने गुरुवारी एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे़ अवघ्या चार दिवसात एक कोटीपेक्षा अधिक रकमेचे घोडे विक्री झाल्याचा हा एक नवा विक्रम आहे़ गुरुवारी दिवसभरात घोडे बाजारात ६९ घोड्यांची विक्री झाली़ यातून ३२ लाख ३८ हजार ६०० रुपयांची उलाढाल झाली आहे़ आजअखेरीस ४५२ घोड्यांची विक्री करण्यात आली आहे़ यातून १ कोटी १९ लाख ८२ हजार ७०० रुपयांची उलाढाल झाली आहे़
आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या छायाचित्रकार कातिया डूज यांच्यासह जपानमधील वाकायामा प्रिफेक्चर गव्हर्नमेंटचे योशियो यामाशिता आणि वाकायामा प्रिफेक्चर गव्हर्नमेंट आंतरराष्ट्रीय नियोजन विभागाचे ओनिशी तात्सुनोरी यांनी चेतक फेस्टिवलला भेट दिली होती़
या तीन परदेशी पर्यटकांसोबतच देशभरातील शेकडो पर्यटक दररोज यात्रोत्सवात भेटी देत आहेत़ यात विशेष म्हणजे दाखल झालेल्या एक हजार ६०० घोड्यांपैकी किमान हजार घोड्यांचे मालक, घोडे प्रशिक्षक, मार्गदर्शक, आहारतज्ज्ञ यांचा समावेश आहे़ देशभरातून आलेल्या या व्यापारी आणि प्रशिक्षकांमुळे घोडेबाजारात मिनी भारताची झलक दिसून येत आहे़ अजून १० दिवस चेतक फेस्टिवल सुरू राहणार आहे़ गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसाम, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गोवासह देशाच्या कानाकोपºयातून दर दिवशी पर्यटक चौकशी करून चेतक फेस्टिवलची वाट धरत असल्याची माहिती आहे़ शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात पर्यटकांची गर्दी वाढण्याचा अंदाज पर्यटन विकास महामंडळाने वर्तवला आहे़