रेशनचे धान्य विक्रीला; चढ्या भावाने खरेदी, तालुक्यात दलाल सक्रीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:35+5:302021-09-15T04:35:35+5:30
अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत वितरीत होणाऱ्या धान्यासह लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत शिधापत्रिकेवरील प्रती सदस्य पाच किलो मोफत तांदूळ वितरीत ...
अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत वितरीत होणाऱ्या धान्यासह लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत शिधापत्रिकेवरील प्रती सदस्य पाच किलो मोफत तांदूळ वितरीत करण्याची सोय करून दिली आहे. मात्र शहादा तालुक्यातील काही रेशन दुकानदार धान्य वाटपामध्ये तफावत करीत धान्य प्रत्यक्ष कमी वितरीत करून बड्या व्यापाऱ्यांना चढ्या भावाने विक्री होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. कठीणसमयी गोरगरीबांचा घास गिळणाऱ्या दलालांवर तसेच दोषी रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
हे घ्या पुरावे
खेडदिगर : महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागात असलेल्या खेडदिगर येथे थेट तालुक्यातील रेशन दुकानातून तांदूळ खरेदी करणारी टोळी सक्रीय असून चढ्या भावाने खरेदी करून जवळच असलेल्या मध्य प्रदेश राज्यात या दलालांचे तांदूळ खरेदी करून मोठमोठे गोडावून तयार करण्यात आले आहेत.
मध्य प्रदेशात विक्रीला सोयीस्कर
काही लाभार्थी दर महिन्याला मिळत असलेले धान्य थेट महाराष्ट्र राज्याच्या शेजारी असलेल्या मध्य प्रदेशातील खेतिया येथे विक्री करीत असल्याचे चित्र दिसून येत असून तेथेच मिळालेल्या पैशांनी दारु पिऊन घरी परत येत असल्याचे आढळून आले.
टोपल्यावर तांदूळ खरेदी
काही व्यापाऱ्यांनी थेट घरी जाऊन रेशनचे धान्य खरेदी करण्याची टोळी तयार केली आहे. टोपल्या विक्री करून तांदूळ खरेदी करीत असल्याचेदेखील तालुक्यातील ग्रामीण भागातील पाहणीत दिसून आले आहे.
सोळा रुपये किलो तांदूळ
रेशनवर तीन रुपये किलो दराने तांदूळ मिळतो. तर काही लाभधारक हाच तांदूळ खेडदिगर येथे व्यापाऱ्यांना १५ ते १६ रुपये दराने विकत असल्याची बाब निदर्शनास आली.
तक्रारदार आला तर कारवाई करू
काही रेशन दुकानदार रेशन वाटपात तफावत करून विक्री करीत असल्याची तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे शहादा येथील तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले.