शहादा-मुंबई शयनयान बस पूर्ववत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:40 AM2019-02-28T11:40:17+5:302019-02-28T11:40:38+5:30
शहादा : शहादा-मुंबई ही शयनयान रातराणी सेवा पूर्ववत वेळापत्रकानुसार सुरू करावी, अशी मागणी विश्वासू प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. ...
शहादा : शहादा-मुंबई ही शयनयान रातराणी सेवा पूर्ववत वेळापत्रकानुसार सुरू करावी, अशी मागणी विश्वासू प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. ही सेवा पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा ईशाराही देण्यात आला आहे.
यासंदर्भात विश्वासू प्रवासी संघटनेने धुळे विभागीय कार्यालयाचे विभाग नियंत्रकांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. शहादा आगारातून गेल्या २० वषार्पासून सायंकाळी सात वाजता शहादा-मुंबई ही बस सुरू आहे. त्यानंतर याच वेळेत शयनयान ही नवी सेवा मंडळाने सुरु केली. शयनयान सेवेची भाडे आकारणी कमी केल्याने या बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता शहादा-मुंबई ही बस सेवा रात्री ९-३० वाजता खेड दिगर येथून सुरु करण्यात आली आहे. ही बस शहादा येथून रात्री सव्वा दहा वाजता मुंबईसाठी मार्गस्थ होत असल्याने तसेच या बस सेवेला धुळे नंतर थेट भिवंडी येथे थांबा असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला आहे. ही बस सेवा शहादा येथूनच पूर्ववत रात्री साडेआठ वाजता मुंबईसाठी सुरू करण्यात यावी. तसेच या बसला धुळे नंतर नाशिक व ठाणे असे दोन थांबे देण्यात यावे, अशी मागणी विश्वासू प्रवासी संघटनेने विभाग नियंत्रक धुळे विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात शहादा-पुणे शयनयान रातराणी सेवेला शिर्डी येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. शहादा आगाराची सकाळी पावणे नऊ वाजता सुटणारी अहमदाबाद व दुपारी साडेबारा वाजता सुटणारी सुरत या शंभर टक्के पेक्षा अधिक भारमान व उत्पन्न देणाऱ्या गाड्या असून, या दोन्ही गाड्या प्रतिष्ठेचा विषय म्हणून दोंडाईचा आगारास वर्ग करण्याचा घाट घातला जात आहे. अहमदाबाद व सुरत या दोन्ही गाड्या दोंडाईचा आगारास वर्ग करण्यात येऊ नये, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. दोंडाईचा येथून सुरत व अहमदाबादसाठी रेल्वेसेवा असल्याने शहादा आगारातून सुटणाऱ्या या दोन्ही बसेस वर्ग करू नये अन्यथा संघटनेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रा.दत्ता वाघ, उपाध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी व सचिव रवींद्र पंड्या यांनी दिला आहे.