लॉकडाऊनला शहादेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 12:24 PM2020-07-06T12:24:31+5:302020-07-06T12:24:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरासह तालुक्यातील अनेक भागात भागात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या लक्षात घेता कोरोना संसर्गाला प्रतिबंध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरासह तालुक्यातील अनेक भागात भागात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या लक्षात घेता कोरोना संसर्गाला प्रतिबंध व्हावा यासाठी प्रशासनाने ८ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. रविवारी पहिल्या दिवशी शहरात नागरिकांची मोठी साथ मिळाली. संपूर्ण शहर बंद असल्याने मुख्य रस्त्यांवर व बाजारपेठेत शुकशुकाट आढळून आला. शहरात येणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यांवर पालिका प्रशासनातर्फे बॅरिकेटींग करण्यात आली असून विनाकारण फिरणाºया ३० मोटारसायकल चालकांवर पोलीस प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
३ जुलैला शहरातील आठ व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने ५ ते ८ जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता किराणा दुकानासह सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. रविवारी पहिल्या दिवशी सकाळपासून शहरातील सर्व व्यवहार बंद होते. काही ठिकाणी लॉकडाऊनचे उल्लंघन करीत नागरिकांनी दुकाने सुरू ठेवली असता पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व कर्मचाऱ्यांनी दुकानदारांना त्वरित दुकान बंद करण्याच्या सूचना दिल्या. यापुढे शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाºयांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, नगरपालिका चौक, गांधी पुतळा परिसर, जुना प्रकाशा रस्ता, मुख्य रस्ता व खेतिया रोड या भागात पालिका प्रशासनाने बॅरिकेटींग केले असून वाहतुकीला मनाई आदेश जाहीर केले आहेत. परिणामी या सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता. शहरात विनाकारण फिरणाºया मोटारसायकलस्वारांवर पालिकेतर्फे मोटारसायकलच्या चाकातील हवा काढून कारवाई करण्यात आली.
शहरासह तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या व्हायरसने ग्रामीण भागाकडे आगेकूच केल्याचे स्पष्ट झाले आहे. याला बहुतांशी नागरिकच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उलंघन करीत नजिकच्या हॉटस्पॉट ठरलेल्या शहरात बिनदिक्कतपणे जाणारे नागरिक येताना दुर्दैवाने कोरोना विषाणू आणत आहेत. या नागरिकांच्या संपर्कातील कुटुंबीय व मित्र परिवारही त्यांच्या चुकीचे बळी ठरत असल्याचे वास्तव चित्र आहे.
८ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या लॉकडाऊन कालावधीत वैद्यकीय सुविधा, मेडीकल स्टोअर्स, दूध विक्री, शासकीय कार्यालये व धान्य गोडाऊन वगळता सर्व प्रकारचे आस्थापना, दुकाने बंद करण्याबाबतचा आदेश जारी करण्यात आले असून या आदेशाचे उल्लंघन करणाºयांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रांताधिकारी तथा इंन्सीडेंट कमांडर डॉ.चेतन गिरासे यांनी दिली आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला होता. नागरिकांनी लॉकडाऊन दरम्यान शहरात गर्दी करू नये यासाठी विशेष खबरदारी पोलीस प्रशासनाने घेत विनाकारण मोटारसायकल घेऊन फिरणाºया ३० मोटारसायकल चालकांविरोधात पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रतिष्ठान बंद ठेवण्यात आले आहे. शहरासह मलोणी व लोणखेडा या भागातही पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे. तालुक्यातील दामळदा गावही तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहे.
आजमितीस तालुक्यात ३७ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून त्यातील १४ रूग्ण सुदैवाने उपचाराला साथ देत घरी परतले. तर शहरासह तोरखेडा, हिंगणी, लोणखेडा येथील प्रत्येकी एका बाधीत रूग्णांचे निधन झाले आहे. सध्या शहाद्यात १९, लोणखेडा येथे एक, हिंगणी येथे सहा तर तोरखेडा येथील सात अशा १९ रूग्णांपैकी १६ रुग्ण जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर दोन रूग्ण धुळे व एक रूग्ण नाशिकला उपचार घेत आहे. या १९ पैकी पाच रूग्ण वगळता उर्वरित १४ रूग्णांना उपरोक्त पाच रूग्णांकडून संसर्ग झाला आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टंन्सिंग व मास्कचे महत्व लक्षात येत आहे.