लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७५९ कुटुंबांना ३०० क्विंटल तांदुळाचे वाटप करण्यात आले आहे. योजनेअंतर्गत २,३९९ शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले असून ६,५०० कुटुंबांना शिधापत्रिका देण्याचे प्रशासनाचे उद्दीष्ट आहे.पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी आढावा बैठकीत शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना धान्य देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यात मोहिम स्तरावर शिधापत्रिका देण्याचा कार्यक्रम राबविला आहे. आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका बनविण्यासाठी येणारा खर्च न्यूक्लिअस बजेटमधून करण्यात येत आहे. आदिवासी प्रकल्प कार्यालयाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.लॉकडाऊनच्या काळात शिधापत्रिका नसलेल्यांना आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अशा कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीचा नियमित लाभ व्हावा यासाठी शिधापत्रिका तयार करण्याची व वाटपाची मोहिम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. त्यानुसार नंदुरबार तालुक्यात ४००, अक्कलकुवा २५५, तळोदा १००, अक्राणी १,३४५, नवापूर ६९ आणि शहादा तालुक्यात २३० शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यातील ६,५०० कुटुंबांना शिधापत्रिका देण्याचे उद्दीष्ट असून कुटुंबातील ३२ हजार सदस्यांना प्रत्येकी ५ किलो मोफत तांदूळ आणि हरभरा देण्यात येणार आहे. मे आणि जून महिन्याकरिता १,८९८ क्विंटल तांदूळ आणि ९२ क्विंटल हरभराचे नियतन शासनाने उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यात ७५९ कुटुंबातील २,९७८ सदस्यांना ३०० क्विंटल तांदळाचे वाटपही करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना पुरवठा विभागाच्या या मोहिमेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शिधापत्रिका मोहिमेमुळे आतापर्यंत सार्वजनिक वितरण प्रणालीचा लाभ न घेतलेल्या नागरिकांनादेखील हा लाभ मिळणार आहे.ही मोहिम सुरू राहणार असून नागरिकांनी शिधापत्रिका नोंदणीसाठी तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेस संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी केले आहे.
साडेसहा हजार कुटूंबांना शिधापत्रिका मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 12:07 PM