कारवाई केल्याने वनविभागाच्या पथकावर दगडफेक, जमावाविरुद्ध गुन्हा
By मनोज शेलार | Published: April 2, 2023 05:23 PM2023-04-02T17:23:28+5:302023-04-02T17:23:32+5:30
जप्त केलेला मुद्देमाल वनविभागाच्या वाहनाने वनरक्षक दिलवर फाड्या पावरा व कर्मचारी हे घेऊन जात होते.
नंदुरबार - वनविभागाच्या कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल घेऊन जात असताना जमावाने रस्त्यावर अडथळा उभारून आणि दगडफेक करून वनविभागाच्या वाहन व कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना नोदलापाडा, ता. धडगाव येथे घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध धडगाव पोलिसांत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, वनविभागाच्या माकडकुंड, ता. धडगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने कारवाई करीत लाकूड व इतर मुद्देमाल काही दिवसांपूर्वी जप्त केला होता. जप्त केलेला मुद्देमाल वनविभागाच्या वाहनाने वनरक्षक दिलवर फाड्या पावरा व कर्मचारी हे घेऊन जात होते. त्यावेळी ईश्वर तडवी व इतरांनी वाहवाणीच्या नोलदापाडा रस्त्यावर वाहनाला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने दगडांची रास रचली. वाहन तेथे येताच अचानक दगडफेक करण्यात आली. त्यात वनरक्षक दिलवर पावरा यांना मार लागला. शिवाय वनविभागाच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले.
याबाबत वनरक्षक दिलवर फाड्या पावरा यांनी फिर्याद दिल्याने ईश्वर ताप्या तडवी (३८, रा. माकडकुंडचा अटविपाडा, ता. धडगाव) व कैलास कुरश्या पाडवी (३७, रा. पौला पाटीलपाडा, ता. धडगाव) व इतर दोन ते तीन जणांविरुद्ध धडगाव पोलिसांत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार आर. बी. पाटील करीत आहेत.