‘स्टडी फ्रॉम होमला’ कनेक्टीव्हीटीचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 01:59 PM2020-04-26T13:59:19+5:302020-04-26T13:59:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा प्रकल्पातील अनेक आश्रमशाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे दुर्गम व अतिदुर्गम भागातील आहेत. ते राहत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा प्रकल्पातील अनेक आश्रमशाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे दुर्गम व अतिदुर्गम भागातील आहेत. ते राहत असलेल्या ठिकाणी नेटवर्क व इंटरनेट कनेक्टिव्ह’टी नसल्याने त्यांच्या ‘आॅनलाईन लर्निंग’ व ‘स्टडी फ्रॉम होम’ला खोडा बसला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मागील महिनाभरापासून सर्व शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांची अध्ययन-अध्यापन प्रक्रियाही थांबली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून काही शाळा-महाविद्यालयांनी आॅनलाईन लर्निंगचा आधार घेत ‘स्टडी फ्रॉम होम’ ही संकल्पना राबवत विद्यार्थ्यांकडून घरुनच अभ्यास करून घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिक्षण विभागाकडूनही सर्व शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून ‘स्टडी फ्रॉम होम’ करून घेण्याचे निर्देश देण्यात आले.
आदिवासी विकास विभागाने शिक्षण विभागाच्या पावलांवर पाऊल टाकत त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिकणाºया विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ‘शाळा बंद, पण शिक्षण नाही’ हा उपक्रम राबविण्यात सुरुवात करण्यात आली. पालकांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांचा त्याद्वारे विविध शैक्षणिक व आरोग्यविषयक बाबी, उपक्रम, चर्चा इत्यादींची माहिती पालकांपर्यंत प्रसारित करणे व विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळांनी हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून पालकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र तळोदा प्रकल्पात येणाºया अनेक आश्रमशाळा व आश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थी हे सातपुड्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील असल्याने नेटवर्कअभावी त्यांना या उपक्रमात सहभागी होऊन अभ्यासाचा आनंद घेता येणे शक्य होणार नसल्याचे चित्र आहे.
तळोदा प्रकल्पात एकूण ४२ शासकीय तर २२ अनुदानित आश्रमशाळा आहेत. यातील अनेक आश्रमशाळा ह्या तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात आहेत. दुर्गम भागात आश्रमशाळा असणाºया जवळपास सर्वच गावात कोणत्याही प्रकारचे मोबाईल नेटवर्क नसते. या भागातून साधा फोन लावण्यासाठीही मोठी तारेवरची कसरत करावी लागते. ज्या शाळा सपाटीवरच्या भूभागावर आहेत व जेथे नेटवर्क कनेक्टिव्हीटी आहे अशा शाळांतील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम व अतिदुर्गम भागातील गावातील आहेत. सध्या हे विद्यार्थी घरी गेले असून त्यांना मोबाईलद्वारेही संपर्क होत नसल्याचा अनुभव आश्रमशाळा शिक्षकांचा आहे. अनेक विद्यार्थी तर नर्मदा किनारीस्थित असणाºया गावातील असून अद्याप काही गावात रस्ते व वीजही नाही. या सर्व प्रकारांमुळे तळोदा प्रकल्पात येणाºया आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्टडी फ्रॉम होम ही संकल्पना वास्तवात उतरू शकली नसल्याची स्थिती आहे.
याशिवाय अनेक पालकांकडे अँड्रॉईड मोबाईलही नसून ज्यांच्याकडे आहेत त्यांचे अँड्रॉईड मोबाईल इंटरनेट व नेटवर्क कनेक्टिव्हिटीअभावी निरुपयोगी ठरले आहेत. ज्यांच्याकडे साधे फोन आहेत त्यांनाच फोन लागत नाही असल्याची स्थिती असताना आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्प कार्यालयाकडून आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नेमके काय करावे, असा प्रश्न आश्रमशाळा शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. शहरी भागातच इंटरनेटअभावी आॅनलाईन लर्निंगमध्ये व्यत्यय येत असताना दुर्गम-अतिदुर्गम भागातील आॅनलाइन लर्निंगद्वारे ‘स्टडी फ्रॉम होम’ सध्या तरी दिवास्वप्नच ठरले आहे.