दामळदा येथील संशयित रुग्णाचे स्वॅब घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 12:27 PM2020-07-06T12:27:02+5:302020-07-06T12:27:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील दामळदा येथील एका युवकाला कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असून आठ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील दामळदा येथील एका युवकाला कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असून आठ जणांना शहादा येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. गावात तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी घेतला आहे.
दामळदा येथील एका युवकाला श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने उपसरपंच डॉ.विजय चौधरी यांनी आरोग्य यंत्रणेला कळवून या युवकाला रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी पाठवून त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले. तर आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या युवकाच्या स्वॅबचे अहवाल येण्याअगोदरच ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन खबरदारीचा उपाय म्हणून गावातून कोणत्याही नागरिकांना बाहेर जाता येणार नाही व बाहेरील नागरिकांना गावात प्रवेश बंद केला आहे. खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यू लावून ग्रामस्थांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. मास्क न लावणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीतर्फे ५०० रुपयांचा दंड जागेवरच आकारण्यात येणार आहे. गावात लागलीच फवारणी करण्यात आली असून उपसरपंच डॉ.विजय चौधरी, पं.स. सदस्या विद्या चौधरी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपाययोजना करीत आहेत.
डामरखेडा, ता.शहादा येथेही एक युवक पॉझिटीव्ह आढळल्याने गावात लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. हा युवक अंकलेश्वर येथून कारने परत येत असताना अचानक त्रास सुरू झाला. त्यात कारचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाल्याने त्याला सुरत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्या स्वॅबचे नमुने घेऊन तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. त्याच्यावर तेथेच शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या वेळी युवकाची पत्नी सोबत होती. त्यानंतर युवकाची पत्नी डामरखेडा येथे आली व मुलगा आणि सासूला घेऊन सुरत येथे गेली. हा युवक वास्तव्यास असलेला परिसर सील करण्यात आला असून ग्रामपंचायतीमार्फत औषध फवारणी करण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर यांनी डामरखेडा येथे भेट देऊन सुरत येथे उपचार घेत असलेल्या युवकाच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही पोहोचला आहे. जनतेचे आरोग्य सुरक्षित रहावे, नागरिकांना मानसिक त्रास होऊ नये म्हणून दामळदा ग्रामपंचायतीने तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच गावात विना मास्क फिरणाºया व्यक्तीला ५०० रुपये दंड आकारणी करण्यात येणार आहे.
-डॉ.विजय चौधरी,
उपसरपंच, दामळदा, ता.शहादा.
दामळदा गावात कोरोना विषाणूची लागण झाल्याची लक्षणे आढळून आलेला एक संशयित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या सुरक्षेकरिता गावात औषध फवारणी करण्यात आली आहे. या विषाणूच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगसह नियमांचे पालन करावे.
-विद्या चौधरी,
सदस्या, पंचायत समिती, शहादा.