नंदुरबार : रखरखत्या उन्हात रुग्णवाहिकेतच एका मातेची प्रसूती झाली. तळोदा ते हातोडा दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर तेथून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जात असताना हातोडा पुलावर रुग्णवाहिका बंद पडली. अखेर दुसऱ्या रुग्णवाहिकेने माता आणि नवजात अर्भकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी, शेंदवाने, ता. धडगाव येथील गरोदर महिलेला बिलगाव आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेने प्रसूतीसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात गुरुवार, १८ रोजी दुपारी नेले जात होते. तळोदा शहराच्या पुढे हातोडा गावाजवळ प्रसूती झाली. रखरखत्या उन्हात दुपारी दोन वाजता प्रसूती झाल्यावर प्राथमिक उपचारासाठी जवळच असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल न करता चालक रुग्णवाहिका नंदुरबारच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. काही अंतराने हातोडा पुलावर रुग्णवाहिका पंक्चर झाली. यातील आणखी दुर्दैवाची बाब म्हणजे पंक्चर झालेल्या रुग्णवाहिकेत चाक बदलण्यासाठी स्टेफनीच नव्हती.
भर उन्हात अर्धा ते एक तास थांबल्यानंतर नंदुरबारहून दुसरी रुग्णवाहिका आली. त्यानंतर प्रसूती झालेली माता व बाळाला हलविण्यात आले. नंदुरबार येथील डॉ. अंजली अग्रवाल यांनी रुग्णवाहिकेत उपचार सुरू केला. या घटनेमुळे पुन्हा आरोग्य यंत्रणेचे वाभाडे निघाले.