मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रचारातील उदासिनता, दोन कट्टर विरोधक एकत्र झाल्याने बदललेले राजकीय समिकरणे, दुबळ्या झालेल्या काँग्रेसचा ऐनवेळी उमेदवार बदलण्याचा निर्णय आणि एकुणच प्रचारातील उदासिनता यामुळे नंदुरबार मतदार संघात जिल्ह्यातील चारही मतदारसंघाच्या तुलनेत सर्वात कमी मतदान झाले. कमी झालेल्या मतदानाचा फटका कुणाला बसतो याकडे आता लक्ष लागून आहे. दरम्यान, करिश्मा घडेल असे काँग्रेसतर्फे सांगितले जात आहे तर सलग दुसरी हॅटट्रीक साधून मोठय़ा मताधिक्याने भाजप उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत निवडून येतील असा दावा भाजपने नेत्यांनी केला आहे. नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणिते यंदाच्या निवडणुकीत बदलली होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसार्पयत एकतर्फी वाटणारी निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसतर्फे भाजपचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रंगतदार झाली. यामुळे प्रचारात रंग भरला जाईल आणि निवडणूक अतीटतीची होईल असे बोलले जात असतांना एकाकी पडलेल्या कॉंग्रेसला शेवटर्पयत सूर सापडला नाही. परिणामी भाजपतर्फे आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी देखील प्रचाराबाबत फारसे गांभिर्य दाखविले नाही. एकाही मोठय़ा नेत्याची सभा मतदारसंघात झाली नाही. राजकीय वातावरणच तापले नसल्याने मतदारसंघात सहाजिकच मतदानाची टक्केवारी घटली. गेल्या निवडणुकीपेक्षा तब्बल पाच टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. कट्टर वैरी झाले मित्रनंदुरबार मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप अशी विळ्याभोपळ्याचे राजकीय शत्रुत्व होते. परंतु काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेची वाट धरल्याने आणि युती धर्माचे पालन केल्याने कार्यकत्र्यानीही निष्ठेने काम केले. त्यामुळे गावागावातील पारंपारिक विरोधक एकत्र आल्याने देखील प्रचारातील उदासिनता दिसून आली. त्याचा परिणाम सहाजिकच मतदानावर झाल्याचे बोलले जात आहे. गेल्यावेळीही सर्वात कमी2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत देखील जिल्ह्यातील चारही मतदार संघापैकी नंदुरबारातच सर्वात कमी मतदान झाले होते. अवघे 61.67 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी भाजपचे डॉ.विजयकुमार गावीत हे 27 हजारापेक्षा अधीक मताधिक्याने निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीत 62.92 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी भाजप उमेदवाराला तब्बल 70 हजारापेक्षा अधीक मताधिक्य होते. कमी मतदानाचा फटका? यंदा कमी मतदानाचा फटका प्रस्थापीत उमेदवारांना बसतो किंवा कसा याबाबत मतेमतांतरे आहेत. डॉ.विजयकुमार गावीत निवडून आल्यास ते मतदारसंघात डबल हॅटट्रीक करतील. जिल्ह्यात आमदारकीची डबल हॅटट्रीक करणा:यांमध्ये ते दुसरे राहतील. आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी डबल हॅटट्रीक केली आहे.
..असे झाले मतदान
नंदुरबार मतदारसंघात एकुण तीन लाख 38 हजार 941 मतदार आहेत. त्यात 1,70,567 पुरुष तर 1,68,367 महिला आणि पाच तृतीयपंथी होते. त्यापैकी 97,334 पुरुष तर 90,037 महिला मतदार आणि एक तृतीयपंथी असे एकुण एक लाख 87 हजार 373 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी अर्थातच 55.28 इतकी राहीली आहे.
नेहमीप्रमाणे शहरी भागात मतदानाची उदासिनता दिसून आली. शिवाय जे मोठी गावे आणि संवेदनशील म्हणून ओळखली जात होती त्या गावांमधील मतदानाची टक्केवारी देखील यंदा घटली आहे. प्रशासनाने मतदानाची विविध माध्यमातून जनजागृती करूनही ही अवस्था राहीली.
डॉ.विजयकुमार गावीत -जमेची बाजू - पारंपारिक व कट्टर विरोधकी चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांना मतदारसंघात विरोधकच उरला नाही. त्यामुळे एकतर्फी प्रचार राहिला. त्याचा फायदा त्यांना मिळाला. उणिवा - विरोधक प्रभावी नसल्यामुळे प्रचारात उदासिनता दिसून आली. अनेक पदाधिकारी आणि कार्यकत्र्याना गावीत व रघुवंशी यांची जवळीकता पचनी पडली नाही. शिवाय मोठय़ा नेत्याची सभा नाही.
उदेसिंग पाडवी - जमेची बाजू - गावीत व रघुवंशी यांची युती पचनी न पडल्याने नाराज गटाची छूपी साथ मिळाली. माजी आमदार असल्याने व अनेक निवडणुका लढण्याचा अनुभव असल्यामुळे निवडणुकीचे मॅनेजमेंट करतांना ते उपयोग पडल्याचे चित्र दिसून आले. उणिवा - भाजपचे आमदार असतांना ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. परिणामी नियोजनाला वाव मिळाला नाही. कार्यकर्ते नसल्यामुळे प्रचार सर्वच ठिकाणी करता आला नाही.
दीपा वळवी - जमेची बाजू - वंचीत बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदारसंघात ब:यापैकी असल्यामुळे आणि उच्चशिक्षीत उमेदवार असल्यामुळे लक्ष वेधून घेतले. काही ठिकाणी प्रचार सभा घेवून भुमिका मांडल्याने ब:यापैकी प्रचार दिसून आला. उणिवा- निवडणूक लढविण्याचा पहिलाच प्रसंग, मोठय़ा नेत्याची न झालेली सभा आणि साधनांचा अभाव दिसून आला.